नागपूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल व आज केलेल्या ट्विटमुळे सीमाप्रश्नावरून चांगलेच राजकारण तापले आहे. यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट बेळगाव, निपाणीची मागणी करताना बोम्मई यांना आव्हान दिले. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी देखील कर्नाटकला टीचभर जमीन देखील जाणार नसल्याचे म्हणत भाजपाची भूमिका स्पष्ट केली.
कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजपाच सत्तेत आहे. मात्र असे असताना देखील दोन्ही राज्यामध्ये सिमाभागावरून चांगलीच खडाजंगी सुरु आहे. राज्य सरकारने जेष्ठ विधिज्ञ वैद्यनाथन यांची सीमाप्रश्नावरील न्यायालयीन लढाईसाठी करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील ४० गावांना तर आज सकाळी सोलापुरातील काही गावांना कर्नाटकात सामील होण्याचे आवाहन केले होते. यामुळे यावर मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिक्रिया येत होत्या.
दोन दिवसांपासून भाजपाच्या वतीने यावर कोणतीहि मोठी प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील टीचभर जमीन कर्नाटकला देणार नाही.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आता महाराष्ट्र भाजपने सडेतोड उत्तर दिलं आहे. भाजपच्याच मुख्यमंत्र्याला भाजपनेच घरचा आहेर दिला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोम्मई यांना ‘कर्नाटकातही अनेक जण मराठी बोलतात. एक टाचणीही जमीन कर्नाटकात जाणार नाही’ असे सडेतोड उत्तर दिले आहे.