मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून सुरु झालेला गहजब थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन दिवसांपासून यावर दोन्ही राज्यातील नेत्यांनी प्रतिक्रियांची राळ उठली असताना उद्धव ठाकरे यांनी देखील कर्नाटक सरकारला सीमा प्रश्नावर फैलावर घेत आपली भूमिका स्पष्ट करताना राज्य सरकारला देखील कानपिचक्या दिल्या.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे ‘महाराष्ट्रात खोके सरकार आल्यापासून राज्याची सातत्याने अवहेलना होत असून आज अचानक सलाकी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याच्या अंगात भूत संचारलं’ असे म्हणत त्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. ‘महाराष्ट्रात माणसे राहातच नाहीत, महाराष्ट्राला स्वाभिमान, अस्मिता, हिंमत काहीच नाही कुणीही यावं आणि टपली मारून जावं’ असे म्हणत त्यांची शिंदे फडणवीस सरकारवर केली.
महाराष्ट्र शिवाजी महाराजांना मानतोच हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यांचा अपमान झाल्यानंतर गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. ज्यांनी महाराजांचा अपमान केला, त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दिल्या जात आहेत”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
या सरकारला मुख्यमंत्री आहेत की नाही कळतच नाही. कारण मुख्यमंत्री काही बोलतच नाहीत. त्यांना काही विचारलं तर ते सांगतील ‘काळजी करू नका. मी पंतप्रधानांना सांगितलं आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यावर टीका केली.