लहू चव्हाण
पाचगणी : गोडवली (ता.महाबळेश्वर) येथील तपणेश्वर मंदिर परिसरातील एका घरासमोरुन बिबट्या जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मंदिर परिसरात राहत असलेल्या शिवसेनेचे तालुका प्रमुख उमेश गुरव यांच्या भावाच्या घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री दोनच्या सुमारास बिबट्या मुक्तपणे फिरताना दिसला.
घराच्या परीसरातील दोन कुत्री अचानक गायब झाल्याने अशोक पोरे यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता दोन बिबटे मुक्तपणे फिरताना दिसले.
घरासमोरील परीसर झाडी व डोंगर कपारीचा असल्याने दोन वर्षांपूर्वीही याच परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले होते. परीसरात बिबट्याची विष्ठा, पायाचे ठसे आढळल्याने त्यावेळी वनविभागाने ट्रॅकिंग कॅमेरे लावले होते. त्या कॅमेऱ्यातही बिबट्या कैद झाला होता. या परीसरात वावरत असलेल्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परीसरातील नागरिकांनी केली आहे.