लोणी काळभोर, (पुणे) : हवेलीसह संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेल्या पुर्व हवेलीमधील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड व सरपंच गौरी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नवपरिवर्तनच्या १७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बाजी मारली आहे.
या निवडणुकीत माजी सरपंच गणपत बापु काळभोर, माजी उपसरपंच देविदास अण्णा काळभोर, अशोक कदम, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रितम गायकवाड, बाळासाहेब गुजर, दत्तोबा काळभोर, ज्ञानेश्वर काळभोर, रमेश कोतवाल, अशोक शिंदे, वसुधा केमकर, रुक्मिणी चांदणे, राजेंद्र काळभोर, प्रकाश उद्धव काळभोर, गुरुदेव जाधव सर हे पॅनल प्रमुख असणार आहेत. या निवडणुकीसाठी १७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून स्वतः चित्तरंजन गायकवाड यांनी सरपंच पदासाठी अर्ज केला आहे.
चित्तरंजन गायकवाड व माजी सरपंच नंदू काळभोर या दोन्ही नेत्यांनी ग्रामपंचायतीवर आपल्याच गटाची सत्ता यावी, यासाठी पूर्ण क्षमतेने सुरवात केली असून वरील दोन्ही नेत्यांसाठी पैशापेक्षाही प्रतिष्ठा मोठी असल्याने, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची निवडणुक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीत एकुन सतरा सदस्य असुन, ग्रामपंचायतीवर मागील पाच वर्षापासुन विद्यमान सरपंच गौरी गायकवाड व चित्तरंजन गायकवाड यांच्या गटाचे निर्वीवाद वर्चस्व राहिले आहे. पाच वर्षापुर्वी गौरी गायकवाड या थेट जनतेतुन मोठ्या मताधिक्क्याने सरपंच म्हणुन निवडुन आल्या होत्या. मागील पाच वर्षाच्या काळात ९० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेसह अनेक कोटींची कामे मार्गी लागलेली आहेत.या विकास कामांच्या जोरावर गौरी गायकवाड व चित्तरंजन गायकवाड यांनी सलग दुसऱ्यांदा ग्रामपंचायतीची सत्ता राखण्यासाठी पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदची पंचवार्षिक निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होणार आहे. मागील १० वर्षात जिल्हा परिषदेचे सदस्यपद सर्वसाधारण गटासाठी आलेले नाही. यामुळे पुढील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सदस्य पद सर्वसाधारण महिला अथवा सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर होण्याची शक्यता आहे. याचमुळे आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच, चित्तरंजन गायकवाड व नंदू काळभोर यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जातीने लक्ष घातले आहे. यामुळे निवडणुक ग्रामपंचायतीची असली तरी, लक्ष मात्र जिल्हा परिषद असल्याने आगामी निवडणूक लक्षवेधी होणार यात कसलीही शंका नाही.
सरपंच व सतरा सदस्य पदासाठी भरलेले अर्ज प्रभागानिहाय पुढीलप्रमाणे :
सरपंच – चित्तरंजन त्रिंबक गायकवाड
प्रभाग १ – आकाश धनंजय काळभोर, सविता नवनाथ साळुंके, ज्योती सचिन दाभाडे, अलिशा अतुल कदम
प्रभाग २ – राजश्री उदय काळभोर, मंदाकिनी सुर्यकांत नामुगडे, बिना तुषार काळभोर,
प्रभाग ३ – सुनंदा देविदास काळभोर, दीपक नवनाथ अढाळे,
प्रभाग ४ – रुपाली सतीश काळभोर, अभिजित रामदास बडदे, नासीरखान मनुलाखान पठाण
प्रभाग ५ – स्वप्नील शिवाजी कदम, अविनाश विजय बडदे, सोनाबाई अशोक शिंदे
प्रभाग ६ – माधुरी चंद्रदीप काळभोर, सलीमा कलंदर पठाण