पुणे : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाची आज गुरुवार (ता. १० ) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात पाहणी केली. लोणावळा ते खोपोली एक्झिट असा १३.३ किलोमीटरचा हा प्रकल्प असून प्रकल्पातील दोन्ही बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
पुणे – मुंबई महामार्गावर अनेकदा वाहतूक कोंडी, दरड कोसळण्याच्या घटनांमुळे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक, प्रवाशांना मनस्थाप सहन करावा लागतो. पण, मिसिंग लिंक प्रकल्पामुळे हा मनस्ताप कमी होऊ शकणार आहे. कारण लोणावळा ते खोपोली असे १३ किलोमीटरचे अंतर या बोगद्यातून पार करता येणार आहे. याच बोगद्यांचे काम जलदगतीने सुरु आहे. या प्रकल्पामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची २० ते २५ मिनिटांची बचत होणार असून हा प्रकल्प पूर्ण होताच सहा किलोमीटरच अंतर कमी होणार आहे.
आशिया खंडातील सर्वात जास्त रुंदी (२३.७५ मी) चा बोगदा असल्याच सांगण्यात येत आहे. वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. या बोगद्याचे काम हे अंतिम टप्प्यात असून डिसेंबर महिन्यात पूर्ण करण्याचा एमयसआरडीसीचा मानस आहे. या प्रकल्पामुळे बोरघटातील वाहतूक कोंडीतून प्रवाश्यांची सुटका होणार आहे.
प्रकल्पात दोन बोगदे आणि दोन व्हायाडक्टसह आठ पदरी नवीन रस्ते बांधले जाणार आहेत. लोणावळा पासून सुरू होणारा हा बोगदा खोपोली एक्झिट येथे संपणार आहे.