पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘‘स्टार्ट अप इंडिया’’ या यशस्वी योजनेत महिलांचा वाटा ५० टक्के आहे. त्यामुळे ही योजना यशस्वी झाली. तसेच, ‘‘इंद्रायणी थडी’’ च्या माध्यमातून १ हजार महिला बचतगटांच्या माध्यमातून सुमारे २० हजार महिलांच्या हाताला रोजगार मिळाला, ही बाब कौतुकास्पद आहे, अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीतील गावजत्रा मैदानावर ‘‘इंद्रायणी थडी- २०२३’’ महोत्सवाचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी झाला. दीप प्रज्वलन करुन महोत्सवाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रखर हिंदूत्वाचा पुरस्कर्ते कालिचरण महाराज, समरसता गुरूकुलमचे पद्मश्री गिरीश प्रभुणे, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार राहुल कुल, उमा खापरे, जगदीश मुळीक, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार शरद सोनवणे, बापुसाहेब पठारे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, कांचन कुल, शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पुजा लांडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, भाजपा सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभू श्रीराम यांचे मूर्ती देवून माजी महापौर माई ढोरे, नितीन काळजे, राहुल जाधव यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. तसेच, माजी समिती सभापती विलास मडीगेरी, सतोष लोंढे यांच्याहस्ते चंद्रकांत पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, दिगंबर भेगडे आणि बाबुराव पाचर्णे यांच्या कुटुंबियांनाही प्रभू श्रीराम मूर्ती भेट देण्यात आली. माजी नगरसेविका नम्रता लोंढे यांनी प्रास्ताविक केले. कालिचरण महाराज यांचे शिवतांडव स्त्रोत पठन करण्यात आले. आभार पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय फुगे यांनी मानले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपा सत्ताकाळात राज्यातील महिला बचतगट सक्षमीकरण चळवळीच्या माध्यमातून ३ लाखहून ५७ लाख महिलांना जोडण्यात आले. महिलांना १ लाखपर्यंतचे लोन बिनव्याजी देण्याचा निर्णय घेतला. महिला बचतगटांची कर्जवसुली १०० टक्के होते.
मातृशक्ती या मानव संसाधनाचा समावेश विकास प्रक्रियेत केल्यास प्रगती निश्चित आहे. अर्थव्यवस्था आणि सामाजिक प्रवाहात महिलांना सहभागी करुन घेतले पाहिजे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांना उद्योगांशी जोडले पाहिजे.
पिंपरी-चिंचवडच्या मातीला आजही ग्रामीण संस्कृतीचा सुंगध आहे. त्यामुळे ग्राम संस्कृती आणि सुमारे ८०० वर्षांचा लढा यशस्वी झाल्यानंतर अयोध्येत साकारणारे प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती, भारतीय जनता पार्टीला वाढवण्यासाठी निष्ठा जपणारे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, दिगंबर भेगडे, बाबुराव पाचर्णे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांची अर्धाकृती शिल्पे उभारण्यात आली आहे.
तसेच, आपल्या मातोश्री कै. हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ इंद्रायणी थडी मातृत्वाला समर्पित केली. त्यांचेही अर्धाकृती शिल्प उभारून जगभारातील मातांप्रति आदर व्यक्त केला. भव्य-दिव्य संकल्पना आणि उपक्रम राबवणारे महेश लांडगे संवेदनशील मनाचे आमदार आहेत, हे यातून दिसून येते, असेही फडणवीस म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, महेश लांडगे यांचा प्रत्येक उपक्रम भव्य-दिव्य असतो. बैलगाडा शर्यत, पक्षनिष्ठा पुतळे, प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृती, ग्रामीण संस्कृती, रिव्हर सायक्लोथॉन असे रेकॉर्ड ब्रेक उपक्रम राबवले जात आहेत.
प्रत्येक बाबींचा बारकाईने विचार केलेला पहायला मिळतो. ज्यांनी भारतीय जनता पार्टी पक्ष उभा केला. त्यांचे पुतळे या महोत्सवात लावण्यात आले आहेत, ही सर्वात महत्वाची बाब आहे. पाच हजाराहून अधिक वर्षांपासून हिंदू समाज ज्यांचे नाव घेवून पुढे आला त्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. महिला बचतगटांकडून तयार केलेल्या वस्तुंना मार्केट मिळाले पाहिजे, तर प्रोत्साहन मिळेल, हा हेतू स्वागतार्ह आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, जत्रेत येणाऱ्या नागरिकांनी बचतगटांची उत्पादने खरेदी करावीत. मॉलमध्ये खरेदी न करता बचत गटांकडून नागरिकांनी उत्पादनाची खरेदी करावी. यासाठीच हे व्यासपीठ उपलब्ध केले आहे.
यापुढील काळातही हा महोत्सव भव्य स्वरुपात राखवला जाणार आहे. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवात अमृता फडणवीस यांना भेट देण्याबाबत विनंतीही आमदार लांडगे यांनी केली.
यावेळी भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीला फडणवीस यांनी भेट दिली होती. त्यावेळी लांडगे यांनी शिवून दिलेल्या ड्रेसच्या आठवणी बोलून दाखवल्या. तसेच, यापुढील काळत भाजपाकडून देण्यात येणारी प्रत्येक जबाबदारी विश्वासाने पार पाडणार आहे, अशा विश्वासही लांडगे यांनी व्यक्त केला.