पुणे : राज्यात रविवारी १८ जिल्ह्यांमध्ये १०७९ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्याचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या वेळी सरपंचाची निवड थेट जनतेतून झाली. राष्ट्रवादी ९८, भाजपने ३९७, शिंदेसेना ८१,शिवसेना ठाकरे पक्ष ८७, काँग्रेसने १०४ जागा जिंकल्याचा दावा केला. अपक्षांच्या ताब्यात तब्बल ३१२ ग्रामपंचायती असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरेसेना आणि शिंदेसेना यांच्यात जास्त फरक नाही. शिवसेना ठाकरे सेनेच्या ताब्यात ८७ ग्रामपंचायती आहेत. शिंदेंसेनेच्या ताब्यात ८१ ग्रामपंचायती आल्या आहेत. दोन्ही गटांमध्ये ६ ग्रामपंचायतींचा फरक आहे. हा फरक मोठा मानला जात नाही.
रत्नागिरी ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे याच्या सेनेचा बोलबाला पाहायला मिळाला. एकूण २४ ग्रामपंचायतींमध्ये उद्धव ठाकरेंच्या सेनेची सत्ता आली आहे, तर शिंदे गटाला फक्त ७ ग्रामपंचायतींमध्ये यश आले आहे.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना होम टाऊन गोंदियात एकाही ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला नाही. पाचपैकी चार ठिकाणी भाजप, तर एका ठिकाणी काँग्रेसने यश संपादन केले.
शिंदेसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांच्या ताब्यात असलेली पाट्ये पुनर्वसन ग्रामपंचायत भाजपकडे गेली. केसरकरांच्या मतदारसंघात शिंदेसेनेला एकही ग्रामपंचायत राखता आलेली नाही, तर राज्यात अनेक ठिकाणी अपक्षांनी बाजी मारल्याचे या निवडणुकांच्या नििमत्ताने समोर आले आहे.