गांधीनगर (गुजरात): केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार असून १ व ५ डिसेंबर रोजी दिवशी मतदान होणार आहे. मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.
४.९ कोटी मतदार गुजरातमधील नव्या सरकारसाठी मतदान करणार आहेत. गुजरात विधानसभेत १८२ जागा आहेत. पहिल्या टप्प्यात ८९ आणि दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर निवडणूक होणार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ३.२४ लाख मतदार पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.
गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला काँग्रेस आणि आम आदमी पक्षांचे आव्हान आहे.२०१७ मध्ये झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला काँग्रेसने जोरदार टक्कर दिली होती. भाजपचे संख्याबळ १०० खाली आले होते. तर, काँग्रेसने ८० जागांवर मुसंडी मारली होती.
यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आहेत. पाटीदार आंदोलनाचा चेहरा असलेले हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचा कमळ हाती घेतला. तर, काँग्रेसच्या काही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर, दुसऱ्या बाजूला गुजरातच्या शहरी भागात आम आदमी पक्षाची ताकद वाढली असल्याचे नगरपालिका, महापालिका निवडणुकीत दिसून आले. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये महिलांसाठी १२७४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दिव्यांगासाठी खास मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे.