पुणे : सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काहीही खपवून घेणार नाही. शिवरायांचा चुकीचा इतिहास लोकांसमोर आणू नये. इतिहासाचा गाभा सोडून काहीही दाखवू नका, इतिहासाचा विपर्यास करु नका. कलाकार मंडळींनी हे गांभीर्याने घ्या. असे चित्रपट काढले तर गाठ माझ्याशी आहे परत सांगितलं नाही म्हणाल… असा सज्जड दमच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.
यावेळी ‘हर हर महादेव’ चित्रपटावर संभाजीराजेंनी सडकून टीका केली. तसेच या चित्रपटावर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. त्याचवेळी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटावर देखील संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट येत आहेत. ‘हर हर महादेव’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. तर ‘वेडात वीर मराठे दौडले सात’ या चित्रपटाच्या मुहूर्ताचा कार्यक्रम संपन्न झालाय. हर हर महादेव चित्रपटातील दृश्यांवर आणि आशयावर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतलाय. तर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातील मावळ्यांच्या वेशभूषेवर राजेंनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलीये.
शिवाजी महाराज हे आपले प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्याविषयी चित्रपट बनविताना जरा भान बाळगण्याची आवश्यकता आहे. चित्रपट काढताना इतिहासाचा अभ्यास हवा. सेन्सॉर बोर्डात ऐतिहासिक चित्रपटांसाठी समिती असावी. मी याचा पाठपुरावा करणार आहे. इतिहासाचा गाभा सोडून काहीही दाखवू नका, इतिहासाचा विपर्यास करु नका. ज्या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास झालाय ते चित्रपट लोकांनी अजिबात पाहू नका, असं आवाहन करतानाच असे चित्रपट कराल तर गाठ माझ्याशी आहे, असं दमच संभाजीराजेंनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांना भरला.