दिल्ली : एक इंचही जमीन कोणी घेऊ शकत नाही. हे भाजपाचे सरकार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा चीनला ठणकावले असताना भारतीय सैन्यदलाने केल्या पराक्रमासाठी सैन्यदलाचे कौतुक देखील केले.
काल अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये चीनच्या सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला भारतीय सैन्यदलाने जोरदार प्रत्युत्तर देताना चिनी सैनिकांना माघारी पाठवले होते. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चीनला कडक इशारा दिला आहे.
यावर बोलताना अमित शहा यांनी भारतीय सैन्यदलाचे कौतुक केले. मात्र असाच प्रयत्न चीनने सन २०११ साली केला होता तेव्हा काँग्रेस सरकारने चीनच्या धमकीनंतर सीमेवर सुरु असलेले बांधकाम थांबविले होते. काँग्रेस सरकारच्या काळात हजारो एकर जमिनी बाळकवल्या गेल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी केला.
राजीव गांधी फाऊंडेशनला सन २००५/०६ आणि २००६/०७ साली चिनी दूतावासाकडून १ कोटी ३५ लाख रुपयांचे अनुदान मिळाले होते. तसेच इस्लामिक रिसर्च फाऊंडेशचा प्रमुख झाकीर नाईकने ७ जुलै २०११ रोजी राजीव गांधी फाऊंडेशला ५० लाख रुपयांचा निधी दिला होता, हे पैसे झाकीर नाईक यांनी कोणत्या उद्देशाने दिले असा प्रश्न उपस्थित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस व राजीव गांधी फाउंडेशनवर हल्ला चढविला.