मुंबई : सिल्लोडचे आमदार व मंत्री अब्दुल सत्तर यांनी काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करताना महाराष्ट्रात खळबळ माजवून दिली होती. त्यांच्या विधानानंतर राष्ट्रावादी काँग्रेसने आक्रमक पावित्रा घेताना राज्यभर आंदोलने केली. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेताना अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन दिले होते.
यावर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अब्दुल सत्तार यांना समज देण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. हे पत्र खासदार फौजिया खान यांनी आपल्या ट्विटरद्वारे प्रसिद्ध केले आहे.
‘महाराष्ट्र राज्य सरकारमधील जबाबदार पदावर कार्यरत असणाऱ्या मंत्र्यांनी महिलांबाबत अपमानास्पद विधाने केली. याच्या निषेधार्ह सर्वपक्षीय महिला आमदार, खासदारांच्या शिष्टमंडळाने राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे निवेदन दिले होते. याची दखल राज्यपालांनी घेतली असून या संदर्भातील निवेदन उचित कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. याबद्दल राज्यपाल महोदयांचे आभार,’ असं ट्वीट फौजिया खान यांनी केलं आहे.
राज्यपालांनी समज देण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.