Gopinath Munde Political Journey : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नावं म्हणलं की, गोपीनाथ मुंडे हे नाव समोर येत. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती. जनमानसातील ओळख तसेच करारी आवाज आणि लोकांवर प्रभाव टाकणारं भाषण करणारं जबरदस्त व्यक्तिमहत्व अशी गोपीनाथ मुंडे यांची ओळख होती.
गोपीनाथ मुंडे यांनी आख्खा महाराष्ट्र पिंजून काढत भारतीय जनता पक्षाचा पाया भक्कम केला. आज महाराष्ट्रात भारतीय जनतेचा जो वटवृक्ष वाढलाय त्याचं श्रेय हे निर्विवादपणे गोपीनाथ मुंडें यांना जातंय. 12 डिसेंबर 1949 रोजी परळी येथे जन्मलेल्या गोपीनाथ मुंडे यांचे व्यक्तीगत आणि राजकीय आयुष्यही अत्यंत खडतर स्थितीत गेले.
पांडुरंगराव मुंडे आणि लिंबाबाई मुंडे यांच्या पोटी जन्माला आलेले गोपीनाथराव यांच्या शालेय शिक्षणाचा प्रवास हा गावातील प्राथमिक शाळेत झाडाच्या सावलीत सुरू झाला होता. पण चिकाटीच्या जोरावर हा माणूस आयएलएस कॉलेजमध्ये वकीलीचे धडे गिरवू लागला. पण ते सेक्शन घेत असतानाच सामाजिक आणि राजकीय चळवळीकडे त्यांना खेचलं गेलं.
पण पुढे महाराष्ट्राला एक तडफदार आणि जनमानसातील ओळख असलेला गोपीनाथ मुंडे यांच्या रूपात एक नेता मिळाला. ते पुढे केंद्रात मंत्रीही झाले, मात्र अकाली अपघाती मृत्यूमुळे त्यांना केंद्रात आपले काम फारसे दाखवता आलं नाही. अशा या नेत्याच्या व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनाविषयी आपण जाणून घेऊयात.
प्राथमिक शिक्षण झाडाच्या सावलीत
गोपीनाथ मुंडेंचा शैक्षणिक प्रवास हा त्यांच्या गावातील प्राथमिक शाळेत झाडाच्या सावलीत सुरू झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण सुरु होऊनही त्यांनी शिक्षण पुढे कायम ठेवण्यावर भर दिला. पुढे त्यांनी आयएलएस कॉलेजमध्ये दोन वर्षांचा एलएलबी प्रोग्राम सुरू केला.
राजकीय प्रवास
गोपीनाथ मुंडेंनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. इंदिरा गांधींनी भारतात लावलेल्या आणिबाणी विरोधात त्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी अटक करुन त्यांना नाशिकच्या तुरुंगात टाकण्यात आलं होतं. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली.
विधानसभेचा कार्यकाळ
युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी झपाटून कामाला सुरूवात केली. त्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातलं गाव अन् गाव पिंजून काढलं. त्याचा फायदा गोपीनाथ मुंडेंना झाला आणि त्यांचा जनसंपर्क वाढला. गोपीनाथ मुंडेंनी 1980–1985 आणि 1990–2009 या काळात पाच वेळा विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम केलं. 1992-1995 या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं.
35 वर्षे बीड जिल्ह्याचं एकहाती नेतृत्व
गोपीनाथ मुंडे यांनी तब्बल 35 वर्षे बीड जिल्ह्याचं एकहाती नेतृत्व केलं. त्यांच्या राजकारणाचा प्रभाव हा मराठवाड्यातही मोठ्या प्रमाणात होता. राज्याच्या राजकारणात त्यांनी दिग्गज मानले जाणाऱ्या शरद पवारांशी टक्कर घेतली आणि त्यांना अनेकदा जेरीसही आणलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तेवढ्याच ताकदीने विरोध करून त्यांनी भाजपच्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर केलं. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचे राजकारण चांगलेच झळाळून निघाले.
लोकसभेचा कार्यकाळ आणि केंद्रीय मंत्रिपदाची शपथ
लोकसभा निवडणूक 2009 आणि 2014 मध्ये विजय मिळवत गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. राष्ट्रीय राजकारणातही त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. 2014 साली केंद्रात मोदींचं सरकार आलं त्यावेळी गोपीनाथ मुंडे हे दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आले. 26 मे रोजी त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आणि देशाच्या ग्रामविकास खात्याची सूत्रं हाती घेतली. केवळ एका आठवड्यानंतर 3 जून रोजी दिल्ली विमानतळाकडे जाताना गोपीनाथ मुंडे यांचा दिल्ली येथे अपघात झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
महाराष्ट्रातील जनमानसात आणि खेड्यापाड्यात आज त्यांचे लाखो समर्थक
गोपीनाथ मुंडे यांचे निधन झालं असलं तरी महाराष्ट्रातील जनमानसात आणि खेड्यापाड्यांसह वाड्यावस्त्यांवर आजही त्यांचे लाखो समर्थक आहेत. आज रोजी राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांच्या भगिणी खासदार प्रीतम मुंडे या दोन्ही कन्या गोपीनाथरावांचा राजकीय आणि सामाजिक वारसा पुढे चालवत असून गोपीनाथ मुंडे यांना मानणाऱ्या वर्गाचा मुंडे भगीनिंना चांगला पाठिंबा मिळत आहे.