उरुळी कांचन, (पुणे) : “जरी खासदार नसलो तरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपलेच आहेत. विकासाकांमाना भरीव निधी देण्याबरोबरच रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देताना पीएमआरडी, जिल्हा नियोजन या समित्यांमध्ये भविष्यकाळात उरुळी कांचन येथील सहकाऱ्यांना घेऊन गावच्या विकासासाठी मदत करण्याचे आश्वासन शिंदे गटाचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे उरुळी कांचन तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अलंकार कांचन व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेनामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी आढळराव पाटील बोलत होते.
यावेळी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, पुणे महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे, पुणे जिल्हा अध्यक्ष उल्हास भाऊ तुपे, माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष निलेश माझीरे, जिल्हा संघटक निलेश काळभोर, उपजिल्हाप्रमुख शामराव माने उपजिल्हाप्रमुख विजय कामठे, हवेली तालुका प्रमुख विपुल शितोळे, उप तालुकाप्रमुख हरीश कांचन, हवेली तालुका वैद्यकीय कक्षाचे अभिषेक पवार, विभाग प्रमुख सागर फडतरे, उरुळी कांचन शहरप्रमुख हरीश भिवाजी कांचन गजू जंगम, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांच्या वतीने आढळराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यापुढे बोलताना आढळराव पाटील म्हणाले, “उरुळी कांचन ते डाळिंब रस्ता हा मी स्वतः जातीने लक्ष घालून चार ते पाच कोटी रुपये निधी या रस्त्याला टाकणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपाचा आढावा घेऊन विकासकामांना गती देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
अलंकार कांचन म्हणाले, “उरुळी कांचन गावच्या विकासासाठी जेवढे काय करता येईल ते करण्यासाठी कायम तत्पर आहे. शिवाय लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी कमतरता पडत होती. ती कमतरता नक्कीच या पक्ष प्रवेशाने आपण राज्याचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गावच्या विकासात सहभाग हा नक्कीच वाढणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे.