सागर घरत
Karmala News करमाळा : करमाळा तालुक्यात चार प्रमुख जिल्हा मार्ग मजबुती करण्यासाठी १० कोटी ९२ लाख निधीची तरतूद मार्च २०२२ च्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली होती. परंतु, सरकार बदलानंतर सदर कामावर २३ जुलै २०२२ रोजी स्थगिती देण्यात आली होती. या कामावरील स्थगिती आज सोमवारी (ता.३१ जुलै २०२३) शासन अध्यादेशानुसार उठली आहे. अशी माहिती आमदार संजय शिंदे यांनी दिली. (Karmala News)
पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये रस्ते विकासासाठी मार्च २०२२ च्या अर्थसंकल्पात ३२ कोटी निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यातील मंजूर कामांपैकी चार कामावरती फडणवीस – शिंदे सरकारने स्थगिती दिलेली होती. सदर स्थगिती आज शासन अध्यादेशानुसार उठली असून प्रमुख जिल्हा मार्गांच्या मजबुतीकरणाचे काम यामुळे पूर्ण होणार आहे. (Karmala News)
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मंजुरी मिळालेल्या या रस्त्यावरील स्थगिती उठविण्यासाठी आपण उच्च न्यायालयामध्ये याचिका ही दाखल केलेली होती. त्याचप्रमाणे विद्यमान सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एन्ट्री झाल्यामुळे सदर स्थगिती उठण्यास मदत झाली आहे. असे आमदार शिंदे यांनी सांगितले आहे.
या रस्त्याच्या कामांवरील स्थगिती उठली-
• बोरगाव, करंजे, मिरगव्हाण, निमगाव, गौंडरे, नेरले ते वरकुटे, निंभोरे, लव्हे, जेऊर रस्ता प्रजिमा क्र.६ -२ कोटी ८५ लाख
• मिरगव्हाण, अर्जुननगर, शेलगाव क, सौंदे, वरकटणे, कोंढेज रस्ता प्रजिमा क्र.८ -१ कोटी ९० लाख
• कोर्टी, दिवेगव्हाण, पारेवाडी रेल्वे स्टेशन ते केतुर २ ते पोमलवाडी रस्ता प्रजिमा क्र.१२४ – २ कोटी ८५ लाख
• पारेवाडी, राजुरी, अंजनडोह, झरे, कुंभेज, निंभोरे, मलवडी, दहिवली, कन्हेरगाव ते वेणेगाव प्रजिमा
क्र.४ – ३ कोटी ३२ लाख