पुणे : राज्यातील २४ महानगरपालिकांचे प्रभाग पुन्हा नव्याने करण्यात यावेत असे आदेश सरकारने महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. यावर राज्य सरकारने तडकाफडकी हा निर्णय घेतला असून, यामुळे लोकशाहीची पायमल्ली होत असल्याचा आरोप शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे.
आज सकाळी राज्य साकारकारने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, औरंगाबादसह २४ महानगरपालिका आयुक्तांना सॅन २०११ च्या जनगणनेनुसार नवीन प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. या संबंधीचा आदेश नगरविकास खात्याने काढला आहे. सरकारच्या या निर्णयाचा शहर राष्ट्रवादीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.
येत्या २८ नोव्हेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात अंतिम सुनावणी असताना प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय घेणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याचे मत जगताप यांनी व्यक्त केले. त्याबरोबरीने भाजप रडीचा डाव खेळात असून राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी किमान ७ ते ८ महिने लागणार असल्याने निवडणुका पुन्हा लांबणार आहेत. बहुदा राज्य सरकारला निवडणुका सध्या नको आहेत, असा आरोप देखील जगताप यांनी केला.