पिंपरी : आपली भूमी छत्रपती शिवप्रभुंची आहे. धर्मवीर संभाजीराजांची ही बलीदानभूमी आहे. माऊलींची संजीवन समाधी आणि तुकोबांच्या गाथा इथे जिवंत आहेत, हे इंद्रायणी थडी बघून जाणवते आहे. भारताची संस्कृती आणि सभ्यता रक्षण करण्यासाठी ज्या समर्थ राजकीय नेतृत्वाची आवश्यकता असते, जी मोघलांच्या काळात शिवरायांनी भरुन काढली. त्यापुढे शंभू महाराजांनी भरुन काढली.
आठरापगड जातीतील शौर्यसंपन्न मराठी मनांनी भारतीय सभ्यतेचे बुलंद शक्तीस्थान उभा केले. त्याप्रमाणे नवीन लोकशाही व्यवस्थेमध्ये महेशदादांसारखा संस्कृतीनिष्ठ, धर्मनिष्ठ आमदार आपल्या विभागातून निवडून येतो. याबाबत इथल्या मतदारांचे आभार मानले पाहिजेत, असे गौरोद्गार हिंदू राष्ट्रसेनेचे संस्थापक, प्रखर हिंदूत्ववादी नेते धनंजय देसाई यांनी काढले.
इंद्रायणी थडी- २०२३ महोत्सवाला हिंदू राष्ट्रसेना संस्थापक धनंजय देसाई आणि गोरक्षक श्री शिवशंकर स्वामी यांचा प्रभू श्रीराम मूर्ती देवून आमदार महेश लांडगे यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, राष्ट्रीय खेळाडू योगेश लांडगे उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, प्रखर हिंदूत्ववादी नेता धनंजय देसाई यांची आताच मोठ्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे. हिंदू राष्ट्र हा विचार प्रखरपणे मांडणारे देसाई या महोत्सवाला उपस्थित राहीले. जीवाची पर्वा न करता गोरक्षणासाठी पुढाकार घेणारे श्री शिवशंकर स्वामी यांचा आम्हाला कायम आदर आहे.
धनंजय देसाई म्हणाले की, धाब्यावर गर्दी करुन चरित्रहिनता शिकवून नैतिक पतन घडवून आमदारकी मिळवणारे खूप आहेत. पण, समाजाला आपल्या मूळ स्वभावावर आपल्या पितृदेवतांच्या रक्ताशी एकनिष्ठ करणारा, आपल्या अध्यात्मिक अधिष्ठानाशी एकनिष्ठ करणारा, तसेच नितीमूल्ये आणि राष्ट्रासाठी प्रखर तेज निर्माण करणारा सांस्कृतिक इंद्रायणी थडी भरवणारा आपल्या पितृदेवतांच्या परंपरांशी जोडून आपला कुलधर्म जागृत करणारा महेशदादासारखा आमदार महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रात झाला पाहिजे.
अलबते-गलबते आमदार, खासदार, नगरसेवक आपल्याला सभागृहात पाठवायचे नाहीत. देव-देश आणि धर्म जगणारे आणि जागवणारे लोकप्रतिनिधी आपल्याला सभागृहात पाठवायचे आहेत, असेही आवाहन देसाई यांनी केली.