(Eknath Shinde) पुणे : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळ उडाली आहे. आता थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांना धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. पुण्यातील वारजे परिसरातून 112 हेल्पलाईन क्रमांकावर हा फोन आल्याचे समजत आहे. सध्या याप्रकरणाची पोलिसांकडून दखल घेण्यात आली आहे. पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.
‘मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे’
सोमवारी रात्री ”मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” अशी फोनवर धमकी देण्यात आली होती. सध्या या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याने जेव्हा कॉल केला तेव्हा तो दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्यांदा त्याने ॲम्ब्युलन्ससाठी कॉल होता. पण ॲम्ब्युलन्स न आल्याने त्याने डायल 112 कॉल करुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिस आरोपीची अधिक चौकशी करत आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहे. काही दिवसापूर्वीच आमदार महेश लांडगे, काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना देखील जीवे मारण्याची धमकी फोनद्वारे दिली होती. याप्रकरणी आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली होती.
याशिवाय भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. नागपूर येथे असणाऱ्या गडकरींच्या कार्यालयात तीन वेळा धमकी देणारे कॉल आले होते. हे धमकीचे फोन बेळगावच्या जेलमधून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने करण्यात आले होते. तसेच 2 कोटी रूपये खंडणीची मागणीही करण्यात आली होती.