लोणी काळभोर (पुणे)- पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर ते उरुळी कांचन या दरम्यान वारंवार होत असलेली वहातुक कोंडी व सततचे अपघात कमी करण्यासाठी नगर रस्त्याप्रमाणे, याही मार्गावर दोन मजली उड्डाण पुलासाठी प्रयत्न करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार असून, हा प्रस्ताव घेऊन पुढील आठवड्यातच रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे अशी माहिती शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी लोणी स्टेशन येथे दिली आहे.
पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात शनिवारी (ता. २०) सकाळी सात वाजनेच्या सुमारास कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात, गायत्री व राजश्री या सख्ख्या बहिणींचा मृत्यु झाला होता. कुटुंबाची सांत्वन भेट माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी मंगळवारी (ता.२३) भेट घेतली. यावेळी बोलताना वरील ग्वाही आढळराव पाटील यांनी दिली आहे.
यावेळी शिवाजीराव आढळराव यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे प्रवीण काळभोर, नितीन टिळेकर, विशाल गुजर, शिवसेनेच्या सविता वर्मा, प्रीती नुपारे, सविता जगताप,उदय काळभोर निलेश काळभोर, अभिजित बडदे, राज गुजर, बाळासाहेब कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना शिवाजीरा आढळराव पाटील म्हणाले कि, पुणे-सोलापुर महामार्गावरील १५ नंबर ते उरुळी कांचन येथील खेडेकर मळा या २० किलोमीटरच्या दरम्यान, वारंवार छोटे मोठे व जीवघेणे अपघात सातत्याने होत आहेत. वाहतूक पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे महिन्याला ७ ते ८ जणांचा अपघातात मृत्यू होत आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी लवकरच उपाययोजना सुरु केल्या जाणार आहेत. पुढील आठवड्यात केंद्रियमंत्रई नितीन गडकरी यांची भेट घेऊन, त्यांच्याकडे नगर रोडप्रमानेच हडपसर ते उरुळी कांचन यादरम्यान दोन मजली उड्डाणपुल उभारावी ही मागणी करणार आहे. वहातुक पोलिसांच्या बाबतही मोठ्या प्रमानात तक्रारी आलेल्या आहेत. याबाबत पोलिस आयुक्त अमिताब गुप्ता यांची भेट घेणार आहे.
शिवाजी आढळराव पुढे म्हणाले, पुणे-सोलापुर महामार्गावर हडपसर ते उरुळी कांचन या दरम्यान रस्त्याच्या समष्याबाबत आत्ताच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. पुणे – सोलापूर महामार्गावर लवकरच गतिरोधक, प्लास्टिकचे पट्टे लवकरच बसविण्यात येणार आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन सख्ख्या बहिणींच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असेही आढळराव पाटील यांनी सांगितले आहे.