अजित जगताप
सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुर्नबांधणी दौऱ्यावर अमित ठाकरे असून त्यांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज व भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी भूतकाळातील अनेक आठवणीना उजाळा दिला.
मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी साताऱ्यातील पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज व रयतचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उदयनराजे यांनी अमित ठाकरे यांना शाल, पुष्पगुच्छ, पेढे भरवून सन्मानित केले. तसेच छत्रपती उदयनराजे यांनी ‘बल्गेरिया मॅन’ ही जगविख्यात अत्तराची बाटली अमित ठाकरे यांना भेट स्वरूपात दिली.
अमित ठाकरे यांच्यात सगळ्यांची काळजी घेण्याची क्षमता असून माझा मुलगाच घरी आला असल्याची भावना यावेळी खा. उदयनराजे यांनी बोलून दाखविली. ‘आमचे जिव्हाळ्याचे संबंध असून, ही केवळ कौटुंबिक भेट असून याला राजकारणाची कोणतीही झालर नसल्याचे खा. उदयनराजे यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत खा. उदयनराजे यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली होती, ही आठवण देखील समर्थकांनी बोलून दाखविली. त्यामुळे ठाकरे परिवाराशी असणारे ऋणानुबंध आजच्या भेटीने पुन्हा एकदा आधोरेखित झाले.
यावेळी खा. उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक सुनिल काटकर, बाळासाहेब ढेकणे तसेच मनसेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार, रोशन भोसले, आदिनाथ दुर्गावळे, सोनाली शिंदे, वैशाली क्षिरसागर, राहुल पवार ,भरत रावळ, राहुल शेंडगे आदी मनसे सैनिक उपस्थित होते.