लोणी काळभोर : पूर्व हवेलीत आज पहाटेपासूनच दाट धुक्याची चादर पसरली होती. वातावरणात गारवा वाढल्याने व थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी काही ठिकाणी शेकोट्यासुद्धा पेटविल्या होत्या. तर धुक्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहनांचा वेगही मंदावला होता. गुलाबी थंडी, दाट धुके आणि दवबिंदु असे मनमोहक वातावरण पूर्व हवेलीतील नागरिकांना आज सोमवारी (ता.३०) सकाळी अनुभवले आहे.
पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील गावांमध्ये अत्यंत तीव्र प्रतीचे दाट धुके आज पसरले होते. यामुळे या परिसरातला काही काळ पर्यटनाचे स्वरूपण प्राप्त झाले होते. मात्र, या धुक्याची तीव्रता इतकी होती कि १५ फुटाच्या समोरील काहीच दिसत नव्हते. त्यामुळे पुणे -सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी अडचण निर्माण होत आहे.
पुणे सोलापूर महामार्गावरून जाणाऱ्या चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. तर समोरील वाहनांचा अंदाज येणे शक्य नसल्याने अनेक प्रवाशांनी आपली स्वतःची वाहने रस्त्याच्या बाजूला उभे करण्यास पसंदी दिली. व अपघाताचा धोका टाळण्यासाठी धुक्याची चादर कमी होण्याची प्रतीक्षा करत आहेत. तर दौंड-पुणे लोहमार्गावरून जाणाऱ्या रेल्वेगाड्या या तब्बल एक तास उशिराने धावत होत्या.
या धुक्यामुळे चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली होती. त्यानंतर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास धुक्याचे प्रमाण कमी झाल्याने पुन्हा पुणे- सोलापूर महामार्ग व मध्ये रेल्वेच्या गाड्या पुन्हा वेगाने धावू लागल्या.
दरम्यान, या दाट धुक्यामुळे पूर्व हवेलीत मात्र शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे. शेतातील पिकांवर या धुक्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढत असल्याची खंत शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. या दाट धुक्याची तीव्रता इतकी जास्त आहे.
आज पर्यंत काळामध्ये एवढ्या तीव्रतेचा दाट धुके कधीही पसरलेले बघितले नाही. अशी प्रतिक्रिया प्रवासी आणि शेतकरी वर्गातून व्यक्त करीत आहेत. तसेच या धुक्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकरीवर्गाकडून व्यक्त केली आहे.