सागर घरत
करमाळा : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून पाणी पळवण्याचा बारामतीकरांचा अट्टाहास अजून संपलेला नसून, इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी २१८७९.०३ लक्ष रुपयांची निविदा महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे १९ अंतर्गत कार्यकारी अभियंता, उजनी कालवा विभाग क्रमांक: ८ सोलापूर यांनी काढली आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलेला अट्टाहास सध्याचे भाजप-शिवसेना सरकार पूर्ण करत असल्याचे दिसून येत आहे. याच अनुषंगाने इंदापूरला जाणारे उजनीचे पाणी वाचले पाहिजे यासाठीच, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची आज दि.2 जानेवारी रोजी सकाळी मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांनी दिली.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सोलापूरकरांच्या पाठीत खंजीर खुपसून या संदर्भात प्रक्रिया सुरूच ठेवली. याला भाजप शिवसेना सरकारने खतपाणी घालत इ निविदा प्रक्रिया टेंडर नोटीस वर्तमानपत्रात जाहीर केली हे अत्यंत खेदजनक आहे.
त्यामुळे सरकार कोणाचेही असले तर आम्ही शांत बसणार नसल्याचे सांगून जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांनी या बैठकीसाठी एकत्र येऊन हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारायचा आहे असे आवर्जून सांगण्यात आले आहे.