पुणे : सिंहगड रस्ता येथील अभिरुची मॉलजवळ असलेल्या कै. मोहनराव भिडे उद्यान सहा एकर ३० गुंठे परिसरात असून निधीच्या कमतरतेमुळे रखडलेल्या अवस्थेत आहे. निधीची कमतरता असल्यामुळे उद्यानाचे काम पूर्ण होऊ शकले नसल्याचे पालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यान १० एकर परिसरात आहे, त्यानंतर सर्वात मोठे उद्यान अभिरुची मॉलजवळ सहा एकर ३० गुंठे परिसरात आहे. सध्या या उद्यानाचे काम अर्धवट स्थितीत आहे. या उद्यानासाठी एकूण सहा कोटी रुपयांची तरतूद करण्याची गरज आहे.
पालिकेकडून २०१७ पासून आतापर्यंत दीड कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमध्ये या परिसरात उद्यानाचे काम सुरू करण्यात आले असून आतापर्यंत पथ दिवे, ट्रॅक, बालकांसाठी खेळणीचे साहित्य, लॉन, वृक्षारोपण आदी कामे करण्यात आली आहेत. परंतु ते देखील अर्धवट स्थितीत आहेत त्यामुळे उद्यान असून नसल्यासारखे आहे.
अभिरुची परिसरात साकारण्यात येत असलेल्या उद्यानाच्या निर्मितीस २०१७ रोजी सुरुवात करण्यात आली होती. उद्यानामध्ये नागरिकांसाठी, बालकांसाठी तसेच वयोवृध्द व्यक्तींसाठी विविध गोष्टी साकारण्यात येत असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क, ओपन जिम, बालकांसाठी खेळण्याचे साहित्य तसेच जॉगिंग ट्रॅक करण्यात येणार आहेत.
तसेच पार्किंग आणि स्वच्छ्तागृह यांची देखील निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या धायरी परिसरामध्ये उद्याने नसल्यामुळे नागरिकांना पु. ल. देशपांडे किंवा सारसबाग येथील उद्यानात जावे लागत आहे. त्यामुळे हे उद्यान पूर्ण झाल्यास धायरी, नऱ्हे, वडगाव बुद्रुक, नांदेड गाव आदी परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
कनिष्ठ अभियंता, उद्यान विभाग, पुणे महानगरपालिका ईश्वर ढमाले याविषयी माहिती देताना म्हणाले की , सिंहगड रस्ता परिसरातील उद्यानासाठी पालिकेकडून वेळी वेळी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. परंतु करोना काळात निधी न उपलब्ध झाल्यामुळे या उद्यानाचे काम रखडले आहे. तरी या संदर्भात पालिकेकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. लवकरच निधी उपलब्ध होईल त्यानंतर या उद्यानाचे काम सुरू करण्यात येणार आहे.
युवासेना शहर प्रमुख, निलेश गिरमे म्हणाले की, सिंहगड रस्ता परिसरातील पालक, बालक आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी उद्यान महत्वाचे असून या उद्यानाची आम्ही पालिकेला पाठपुरावा करणारे आहे. त्याचप्रमाणे यासाठी जो निधी लागणार आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे देखील मागणी केली आहे.
–