मुंबई : पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक समाजाभिमुख, नागरी प्रश्नाची जाण आणि त्याची उकल माहिती असलेला लोकप्रतिनिधी आपण आज गमावला आहे. त्यांच्या निधनाने केवळ भारतीय जनता पक्षाचेच नाही तर माझेही वैयक्तिक नुकसान झाले आहे, मी एक चांगला मित्र गमावला आहे.
राजकारण आणि समाजकारणात ठाम भूमिका घेणारा समाजाभिमुख नेता आपल्यातून निघून गेला, अशा शब्दांत उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस आपल्या शोक संदेशात म्हणतात, लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात दिलेले योगदान कायम लक्षात राहील. मतदारसंघाचा विकास हाच ध्यास घेऊन त्यांनी काम केले.
वाढत्या शहरीकरणात वंचित व उपेक्षित घटकांच्या हिताला बाधा न पोहचता विकास झाला पाहिजे यासाठी ते आग्रही होते. आपल्या आजारपणातही त्यांनी राज्यसभेसाठी मतदान करून राज्याचा आवाज संसदेत वाढला पाहिजे, यासाठी आग्रह धरला.
मी त्यांना मतदानात भाग घेऊ नका, आपली तब्येत सांभाळा असे सांगूनही त्यांनी आपली कर्तव्यनिष्ठा दाखवली होती. विधानभवनात पीपीई कीट घालून त्यांचे मतदानाला येणे आणि त्यावेळी अत्यंत प्रेमाने मला दिलेली हाक मी कधीच विसरू शकणार नाही.
मध्यंतरी प्रकृती सुधारत असताना ते आपल्यात पुन्हा परतणार, असा ठाम विश्वास होता. पण आज ही वाईट बातमी आली. या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत.