बंगळूर : गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात गाजत असताना कर्नाटका मराठा फेडरेशनच्या वतीने देखील कर्नाटकात देखील मराठा समाजाला आरक्षण लागू करून सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याकडे मागणी केली आहे.
कर्नाटक सरकारला थोडा अवधी देण्यात यावा, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सुचविले आहे. महाराष्ट्रात यापूर्वी देखील अनेक मोर्चे निघाले मात्र, अजूनही आरक्षण मिळालेले नाही. या पर्श्वभूमीवर कर्नाटक येथील मराठा समाजात ही मागणी जोर धरू लागल्याने मुख्यमंत्री बोम्माई यांनी सावध भूमिका घेतली आहे.
कर्नाटकातील मराठा आरक्षणाच्या संदर्भात कर्नाटका मराठा फेडरेशनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री बोम्माई, माजी मुख्यमत्री लक्षमण सौदी, मंत्री आर. अशोक, अश्वत नारायण याची भेट घेतली. या शिष्ट मंडळाचे नेतृत्व फेडरेशनचे राज्यअध्यक्ष शामसुंदर गायकवाड यांनी केले.
मराठा समाज हा नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून समाजाने नेहमीच पक्षाला सहकार्य केले असल्याचे नेते सांगत आहेत. कर्नाटका मराठा फेडरेशनच्या वतीने मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई व कर्नाटक पक्षाध्यक्ष नवीनकुमार कटील यांना देण्यात आले आहे.