गणेश सुळ
केडगाव, (पुणे) : जालना जिल्ह्यातील अंरतवली सराटी या गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले. दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी याचे तीव्र पडसाद उमटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सहकाऱ्यांसह उपोषण सुरू केले होते. हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू होते. या आंदोलनास ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला होता. आंदोलक मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती खालवत चालल्याने उपोषण मागे घेण्याची विनंती प्रशासनाने केली होती, मात्र ते उपोषणावर ठाम होते.
याच वेळी पोलिसांनी आंदोलनात सहभागी असणाऱ्या तरुणांवर, स्त्रियांवर, लहान मुलांवर तसेच वृद्धांवर अंदाधुंद लाठीचार्ज केला. या लाठीचार्जनंतर जालना जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेचा निषेध ६ सप्टेंबर रोजी दौंड शहरात देखील करणार असल्याचे रमेश थोरात यांनी या वेळी सांगितले.
या घटनेचे तीव्र पडसाद दौंड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही उमटले. मंगळवारी खुटबाव येथील मराठा संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत, पूर्ण गाव बंद ठेऊन या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. तर रविवारी याचे पडसाद पाटस, कानगाव, देलवडी ,पारगाव, केडगाव, पिंपळगाव, कडेठाण या गावांमध्ये उमटल्याचे चित्र पहायला मिळाले. यावेळी सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
देलवडीच्या सरपंच निलम काटे म्हणाले की, यापूर्वी मराठा समाजाने ५८ मूक मोर्चे काढले. मात्र, त्याला गालबोट लागले नाही. परंतु सध्यस्थितीमध्ये आरक्षण देऊ असे आश्वासन देऊन मराठा समाजाच्या डोळ्यांत धूळफेक केली जात आहे. सरकारने लवकरात लवकर योग्य न्याय दिला पाहिजे.
यवत पोलिस स्टेशनचे पीएसआय शेख म्हणाले की, सर्व नागरिकांना आपली मते मांडण्याचा व कुठल्याही घटनेचा निषेध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु सर्वांनी सहकार्य करून शांततेच्या मार्गाने आपला निषेध नोंदवावा. शांतता व सुव्यवस्था बिघडेल, असे वर्तन अथवा पोस्ट करू नये.
खुटबावचे सरपंच शिवाजी थोरात म्हणाले की, ७५ वर्षांमध्ये जवळपास १४० कायदे तयार केले. परंतु अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. आता कोणता कायदा करायचा तो करा; परंतु आरक्षण द्या. आम्ही निषेध करत आहोत, परंतु सरकारी मालमत्तेचे नुकसान केलेले नाही. तशी वेळ येऊ देऊ नका.