संदीप टुले : दौंड
दौंड, (पुणे) : दौंड तालुक्यातील राजकारणात नेहमीच कुल आणि थोरात यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळते. आता या दोघांमध्ये तिसरा प्रतिस्पर्धी येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. भारत राष्ट्र समिती या पक्षाचा प्रचार करणारी गाडी नुकतीच दौंडपर्यंत पोहोचल्याचे पहायला मिळत आहे. (Daund News)
भारत राष्ट्र समिती या पक्षाचा प्रचार करणारी गाडी गुरूवारी (ता. १५) दौंड तालुक्यातील केडगाव येथे पाहायला मिळाली. या गाडीला पक्षाचा झेंडा, पक्षाचे चिन्ह असलेले पोस्टर, स्पीकर तसेच पक्षाने दिलेल्या आश्वासनांचे पोस्टर लावले होते. केडगाव मार्गाने प्रवास करणारे प्रवासी तसेच नागरिक येता-जाता या पक्षाचा मूळ अजेंडा आवर्जून वाचताना दिसत होते. (Daund News)
काय आहे भारत राष्ट्र समितीचा अजेंडा?
भारत राष्ट्र समितीचा अजेंडा शेतकऱ्यांचा विकास हाच आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक लाभाच्या योजना आणण्याचे नियेजन केले आहे. शेतकऱ्यांसाठी उच्च दाबाने २४ तास वीज मोफत, मोफत पाणी, शेतकऱ्यांना दरवर्षी दहा हजार एकरी मदत, पाच लाख रुपयांचा जीवन विमा, दलित कुटुंबांना व्यवसायासाठी १० लाखांचे अनुदान, अशा आश्वासनांचे फलक पाहायला मिळाले. (Daund News)
बीआरएसचा कोणाच्या मतावर डल्ला?
आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांचा बीआरएस पक्ष दौंड तालुक्यात उमेदवार उभे करणार, असे दिसत आहे. दौंड तालुक्यातील राजकारणात नेहमीच कुल आणि थोरात यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळते. २०१९ च्या विधानसभेला तर आमदार राहुल कुल हे जेमतेम ७०० ते ७५० मतांनी निवडून आले होते. त्यामुळे बीआरएसचा उमेदवार नेमका कुणाच्या मतांवर डल्ला मारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Daund News)
दरम्यान, राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. आता भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात प्रचारावर लक्ष देण्याचे ठरवले आणि ग्रामीण भागात आपले उमेदवार उभे केले, तर दौंडमधील लढत तिरंगी होणार, हे नक्की! (Daund News)