लोणी काळभोर (पुणे) – जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायत असा लौकीक असलेल्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या “सरपंच” पदी अपेक्षेप्रमाने नवपरीवर्तन पॅनेलचे प्रमुख व भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी मोठ्या मतांच्या फरकाने एकतर्फी विजय मिळवला आहे. सरपंचाची निवड थेट जनतेतुन असल्याने, चित्तरंजन गायकवाड यांनी त्यांच्या प्रतीस्पर्धी उमेदवार कल्पना काळभोर यांचा अठ्ठावीशेहून अधिक मतांनी पराभाव केला आहे.
तर दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या सतरा पैकी तब्बल सोळांच्या जागांच्यावर दणदणीत विजय मिळवुन, चित्तरंजन गायकवाड व विद्यमान सरपंच गौरी गायकवाड यांनी दुसऱ्यांदा ग्रामपंचायतीची सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. तर विरोधी जनसेवा पॅनेलला, पॅनेल प्रमुख व राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नंदु काळभोर यांच्या रुपाने एका जागेवर विजय मिळवता आला आहे. नंदु काळभोर यांचा सव्वाशे मतांनी विजय झाला आहे.
चित्तरंजन गायकवाड व त्यांच्या पत्नी व विद्यमान सरपंच गौरी गायकवाड यांनी मागील पाच वर्षात केलेली विकास कामे व नागरीकांच्याबरोबर असलेला संवाद यांच्या जोरावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची सलग दुसऱ्यांदा सत्ता आपल्याच हाती राखण्यात यश मिळवले आहे.
तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार काळभोर, भारतीय जनता पक्षाचे वरीष्ठ नेते प्रविण काळभोर व कदमवाकवस्तीचे विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनेलला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान पार पडले होते. ग्रामपंचायतीवर मागील पाच वर्षापासुन भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांच्या गटाची सत्ता आहे. मागील पाच वर्षापासुन चित्तरंजन गायकवाड यांच्या पत्नी गौरी गायकवाड या सरपंच म्हणुन काम पहात होत्या. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची निवडणुक जाहीर झाल्यापासुनच, गायकवाड पती-पत्नीच्या हातातुन सत्ता घेण्यासाठी नंदकुमार काळभोर, प्रविण काळभोर व बाबासाहेब काळभोर, माजी सरपंच ऋुषी काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येत, निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. मात्र मतदारांनी चित्तरंजन गायकवाड यांना सलग दुसऱ्यांदा सत्ता देऊन, चित्तरंजन गायकवाड व त्यांच्या पत्नी व विद्यमान सरपंच गौरी गायकवाड यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
चित्तरंजन गायकवाड यांनी सत्ता पुन्हा एकदा ताब्यात ठेवण्यासाठी तर चित्तरंजन गायकवाड यांच्या ताब्यातुन सत्ता आपल्या हाती घेण्यासाठी नंदकुमार काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मागील आठ ते दहा दिवसाच्या काळात साम-दाम-दंड ही शस्त्रे वापरत मतदारांना आपल्याच बाजुने वळविण्यासाठी रात्रंदिवस एक केला होता. मात्र मतदारांनी सरपंच म्हणुन चित्तरंजन गायकवाड यांना तर ग्रामपंचायतीची एकुन सत्ता नवपरीवर्तन पॅनेलला देऊन, सत्तेचे परीवर्तन करु पाहणाऱ्या जनसेवा पॅनेलला नाकारले आहे.
ग्रामपंचायत हद्दीतील अनेक बड्या नेत्यांनी एकत्र येऊन, चित्तरंजन गायकवाड यांना सत्तेतुन खाली खेचण्यासाठी फिल्डींग लावली होती. मात्र मतदारांनी चित्तरंजन गायकवाड यांच्या हातात एक हाती सत्ता देऊन, विरोधकांना आस्मान दाखवले आहे.
दरम्यान नवपरिवर्तन पॅनेलने कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या निकालात निर्विवाद विजयी वर्चस्व गाजवले. पॅनेलचे प्रमुख चित्तरंजन गायकवाड यांचे एकखांबी, निर्णायक नेतृत्वामुळे हे निर्विवाद विजयी वर्चस्व स्थापन करता आले. त्यांच्या वेळप्रसंगी आक्रमक, संयमी, सर्वसामान्यांना ऑनलाईन व ऑफलाईन, २४ तास सहज उपलब्ध होणा-या नेतृत्वाखालील नवपरिवर्तन पॅनेलने या निवडणुकीत धडाकेबाज कामगिरी केली. पॅनेलमध्ये जिल्हा, तालुका पातळीवर नेत्यांची गर्दी झाली होती. परंतु वेळेवर अचूक निर्णय घ्यायची क्षमता नसल्याने जनसेवा पॅनेलला दारुण पराभव स्वीकारावा लागला.
गेल्या पाच वर्षात विशेषतः करोना महामारी दरम्यान गायब झालेले विरोधी पक्षनेते निवडणूक जवळ आल्यावर सक्रिय झाले होते. हे ही मतदारांनी लक्षात ठेवून मतदान केले. त्यामुळे अशा नेत्यांना निवडणूकीतून मतदारांनी आपली जागा दाखवली असे म्हणता येईल.
चित्तरंजन गायकवाड यांनी मिळवलेला विजय व त्यांना मिळालेली मते पहाता, चित्तरंजन गायकवाड यांनी मागील पाच वर्षात केलेली कोट्यवधी रुपयांची विकासकामे, निवडणूकीचे गेली पाच वर्षे चाललेले उत्कृष्ट नियोजन व विरोधकांच्या प्रश्नांना दिलेली सडेतोड, बिनजोड उत्तरे या सर्वांचा परिपाक म्हणजेच आजचा निवडणूक निकाल आहे. निकाला नंतर ” हा निकाल अपेक्षितच होता ” अशी प्रतिक्रिया मतदारांच्या बरोबर सर्वसामान्य नागरीकांच्यात उमटली आहे.
प्रभागनिहाय उमेदवार पुढील प्रमाणे :-
प्रभाग क्रमांक १ – आकाश धनंजय काळभोर, सिमिता अंगदराव लोंढे, कोमल सुहास काळभोर (नवपरीवर्तन पॅनेल).
प्रभाग क्रमांक २ – बिना तुषार काळभोर, मंदाकिनी सुर्यकांत नामुगडे, राजश्री उदय काळभोर, (नवपरिवर्तन पॅनल).
प्रभाग क्रमांक ३ – दीपक नवनाथ अढाळे, सुनंदा देविदास काळभोर (नवपरिवर्तन पॅनल).
प्रभाग क्रमांक ४ – नासीरखान मनुलाखान पठाण, रुपाली सतीश काळभोर (नवपरिवर्तन पॅनल), नंदू कैलास काळभोर (जनसेवा पॅनेल).
प्रभाग ५ – स्वप्नील शिवाजी कदम, अविनाश विजय बडदे, सोनाबाई अशोक शिंदे (नवपरिवर्तन पॅनल).
प्रभाग क्रमांक ६ – योगेश भाऊराव मिसाळ, सलीमा कलंदर पठाण, राणी प्रितम गायकवाड (नवपरिवर्तन पॅनल).