पुणे : आतापर्यंत आपण जो इतिहास वाचला आहे. त्यात छत्रपती संभाजी महाराजांची ओळख ‘धर्मवीर’ म्हणूनच इतिहासात केली गेली आहे. यामुळे यावरती चर्चा होऊ नये. असे म्हणत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आज रविवारी (ता.२२) आयोजन करण्यात आले आहे. यामोर्चात शिवेंद्रराजे भोसले सहभागी झाले आहे. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना भोसले यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
पुढे बोलताना भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले कि, हिंदू समाजात देखील भीतीव्हे वातावरण आहे. ही भीती कमी करण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे मोर्चाची दखल घेण्यात येईल. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. या स्थापनेच्या वेळी धर्माचं रक्षक करावे हादेखील मुद्दा होता. या मोर्चातून आम्हाला कोणालाही विरोध करायचा नाही आहे. आम्ही फक्त आमचा धर्म जपण्याचा प्रयत्न करत आहोत. असे भोसले यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीरदिन म्हणून साजरा करावा. प्रेमाच्या नावाखाली सुरू असणाऱ्या लव्ह जिहाद विरोधात कायदा व्हावा. धर्मांतर होऊ नये, त्यासाठी कायदे करण्यात यावेत. गोहत्या थांबवण्यात यावी. या सगळ्यांबात कायदे करावे आणि त्याची कठोर अंमलबजावणी करावी, या मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
या मोर्चात महिलांनी शंख नाद करत मोर्चाला सुरुवात केली. त्यासोबतच दगडूशेठ मंदिरात आरतीदेखील केली. आमदार शिवेंद्रराजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई यांचा यात विशेष सहभाग झाले आहेत. तसेच विश्व हिंदू परिषदचे किशोर चव्हाण, पतित पावन संघटनेचे स्वप्निल नाईक, श्री शंभू चरित्र अभ्यासक नीलेश भिसे, राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे सहभागी झाले आहेत.