(Chetan Tupe ) लोणी काळभोर : लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊर, सोरतापवाडी, नायगाव, फुरसुंगी, वडकी, वडाची वाडी, उंड्री, पिसोळीसह पूर्व हवेलीतील गावे एकत्र करून स्वतंत्र हडपसर महापालिका लवकर करावी. अशी मागणी आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) यांनी विधानसभेत शुक्रवारी (ता.२४) केली आहे.
हडपसरकडे लक्ष दिले जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी..!
यावेळी बोलताना तुपे म्हणाले की, ‘‘हवेली तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीचे विभाजन करून छोट्या ग्रामपंचायती करण्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. मात्र, मोठ्या ग्रामपंचायतीमधून कामे होत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्याच पद्धतीने आता पुणे महापालिकेकडून पूर्व पुण्यावर, हडपसरकडे लक्ष दिले जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. म्हणूनच आता हडपसरची, पूर्व हवेलीतील काही गावे मिळून नवीन महापालिका करावी. अशी मागणी आमदार चेतन तुपे यांनी केली आहे.
हवेली तालुक्याचे महसुली विभाजन करत आहोत, असा शब्द येण्याऐवजी तिथे हवेली तालुक्याचे विभाजन झाल्याची चर्चा झाली. महसुली विभाजन झाल्यास एकापेक्षा जास्त तहसीलदार, अधिकारी मिळू शकतील. तसेच पूर्व-पश्चिम व मध्य हवेली, असे महसुली विभाग केल्यावर कामामध्ये सूसुत्रता येऊन कामे अधिक सोपी होतील. असेही आमदार तुपे यांनी सांगितले.
दरम्यान, ‘‘पुणे महापालिकेकडून हडपसर व पूर्व हवेली तालुक्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे एक-दोन गावे तालुक्यातून बाजूला काढण्यापेक्षा पूर्व हवेलीतील गावे एकत्र करून स्वतंत्र हडपसर महापालिका करण्यात यावी. हडपसरला ‘ब’ दर्जाची स्वतंत्र महापालिका केल्यास विकास होईल. याबाबत त्वरित निर्णय घ्यावा. अशी मागणी आमदार तुपे यांनी विधानसभेत केली आहे.