Chatrapati Sambhaji Nagar | छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगरच्या फुलंब्री तालुक्यातील फुलंब्री पंचायत समितीच्या आवारातील हा व्हिडिओ आहे. मंगेश साबळे हे गेवराई पैगा गावचे सरपंच आहेत. पंचायत समितीमध्ये गावातील विहीरी मंजुरीसाठी पैसे मागितीतले जात असल्याने त्यांनी दोन लाख रुपये पंचायत समितीच्या आवारामध्ये उधळले. सरपंच मंगेश साबळे हे व्हिडिओमध्ये सांगतात की, मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी हे शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं सांगत आहेत. परंतु फुलंब्रीच्या बीडीओ मॅडम लाचेची मागणी करतात. गोरगरीब शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कुणीही नाहीये, असा आरोप त्यांनी केलाय.
साबळे व्हिडिओमध्ये पुढे म्हणतात, एका विहीरीच्या मंजुरीसाठी बीडीओ मॅडम १५ हजार रुपये मागतात, इस्टिमेटसाठी इंजिनिअरकडून पंधरा हजार मागितले जातात, ग्रामरोजगार सेवक पंधरा हजार मागतो. एवढे पैसे शेतकरी आणणार कुठून? विहीरीसाठी शासन चार लाख रुपये अनुदान देतं खरं, परंतु हे लोक लाख-दीड लाख रुपये पगारी घेऊनही लाच मागतात.
मी गोरगरीब शेतकऱ्यांची कामं करतो. आज मी २० विहिरींच्या मंजुरीसाठी दोन लाख रुपये देतो पण कामं करा, असा आक्रोश करत सरपंच मंगेश साबळे यांनी पंचायत समितीच्या आवारात अक्षरशः पैशांचा पाऊस पाडला.
दरम्यान, आपण पत्येक शेतकऱ्याकडून दहा हजार रुपये मंजुरीसाठी आणले आहेत. हे पैसे घेऊन त्यांनी विहिरी मंजूर कराव्यात. जर मंजुऱ्या दिल्या नाहीत तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांना नागडं बसवणार असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकांसमर भीक मागण्याचा इशारा व्हिडिओमधून देण्यात आलेला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय येथे रामनवमी उत्साहात साजरी..!