Breaking News : पुणे : भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा वारंवार होत आहेत. नुकतीच त्यांनी दिल्लीमध्ये सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांची भेट घेतल्याची चर्चा देखील झाली. यानंतर त्या भाजपला रामराम करून काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेत, आपली भूमिका स्पष्ट केली.
या बातम्या धादांत खोट्या
पंकजा मुंडे म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासोबत भेट झाल्याच्या बातम्या काही वृत्तपत्रांनी दिल्या. या बातम्या धादांत खोट्या आहेत. भेट सोडा मी त्यांना ओळखत देखील नाही. या बातम्या प्रसिद्ध होत असताना मी मध्यप्रदेशमध्ये पक्षाच्या कामासाठी गेले होते. सध्या भाजप सोडून अन्य कुठेही जाण्याचा विचार मी केलेला नाही. (Breaking News) असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. पंकजा मुंडे म्हणाल्या की, या चुकीच्या बातम्या ज्या वाहिनीने पसरवल्या आहेत, त्यांच्यावर मी मानहानीचा दावा ठोकणार आहे. माझं करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कुणाचा आहे, हे मी शोधणार आहे, असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.
मला पक्षातून अनेक वेळा डावलण्यात आले आहे. २०१९ मध्ये तिकीट देतो असे सांगून तिकीट मिळाले नाही. मात्र, असे असले तरी मी कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. पक्षाचा आदेश माझ्यासाठी सर्वतोपरी आहे. मी गेली २० वर्षे राजकारणात काम करत आहे. (Breaking News) माझ्याबद्दल चर्चा मुद्दाम घडवून आणल्या जातात, हा माझा अनुभव आहे. पण पाठीत खंजीर खुपसण्याचं रक्त माझं नाही. मी यावर पुन्हा-पुन्हा स्पष्टीकरण देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. सध्या मला एका ब्रेकची गरज आहे. मी दोन महिन्यांच्या सुट्टीवर जाणार असून या काळात कोणीही कृपया मला प्रश्न विचारू नये, अशी विनंती देखील त्यांनी माध्यमांना केली आहे.
दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांपासून पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा वारंवार होत होत्या. सांगलीतील एका मोठ्या नेत्याच्या माध्यमातून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली, अशा काही बातम्या देखील समोर आल्या होत्या. (Breaking News) त्यावर आता अखेर पंकजा मुंडे यांनी मौन सोडलं आहे.