Breaking News : मुंबई : राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस कधीही न विसरण्यासारखा आहे. पहाटेचा शपथविधी अयशस्वी झाल्यानंतर आज अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षांत तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार हे देखील उपुमख्यमंत्री असणार आहेत. दरम्यान, आज अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम, संजय बनसोडे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
अजित पवारांचा थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा
शपथविधीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. बहुतांश आमदार, नेत्यांना आमचा निर्णय मान्य आहे. पक्षातील ४० आमदारांचा आम्हा पाठिंबा आहे. लोकशाहीत बहुमताला प्राधान्य असते, ही आजपर्यंतची परंपरा आहे. नवीन नेतृत्व पुढे आलं पाहिजे, यासाठी माझे हे बंड आहे. आम्ही सर्वस्व पणाला लावणार आणि पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार. राज्य आणि देश पातळीवरील निवडणुकीत आम्ही एकत्र लढणार आहोत. आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या चिन्हावरच लढवणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
अजित पवारांच्या बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज अजित पवार आणि त्यांच्या काही सहकारी आमदारांनी आपल्या शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील जे डबल इंजिनचं सरकार आहे, त्याला आता ट्रिपल इंजिन जोडलं आहे. आता राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे धावेल. याचा महाराष्ट्राच्या जनतेला फायदा होईल आणि राज्याचा विकास अतिशय वेगाने होईल, एवढंच मी याप्रसंगी सांगतो.
शपथविधीला शरद पवार यांचा पाठिंबा नाही
दरम्यान, शरद पवार यांनी या शपथविधीला पाठिंबा दिला नाही. त्यांनी ट्विट करून सांगितले की, मी अजूनही खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा मला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू. जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही. शरद पवार म्हणाले, दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारामध्ये सापडलेला पक्ष आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. पण आज त्यांनी मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही सदस्यांना शपथ दिली आहे. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप सत्य नव्हते हे सिद्ध केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, अशी गुगली शरद पवार यांनी टाकली.
राज ठाकरे यांची प्रतिक्रीया
मनसे प्रमुख राज ठकरे यांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे. उद्धव ठाकरे यांचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. शरद पवारांची पहिली टिम रवाना झाली आहे. लवकरच दुसरीही टिम त्या दिशेने जाईल, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
अमित शाह यांच्या महत्त्वाच्या सूचना
महाराष्ट्रात विधानसभेच्या १४५ जागा हव्या असतील तर अजित पवार आपल्यासोबत हवेत, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदेश दिले होते. आज दिल्लीत अनेक घडामोडी घडल्या आहेत. दिल्लीत प्रचंड खलबते झाली. त्यानंतर आजचा राजकीय भूकंप घडून आल्याचं चित्र आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर भविष्यात राज्याच्या राजकारणात काय बदल घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.