धारूर, बीड : बीड जिल्ह्यातील धारूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी १८ पैकी १७ जागा जिंकताना एकहाती विजय साकारला आहे. त्यामुळे हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मनाला जात असून या ठिकाणी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंखे यांच्या पॅनलचा सपशेल परभव झाला आहे.
दोन्ही बाजूने ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. गुरुवार (दि. १५) रोजी या निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपन्न झाली. यात भाजपाने मोठ्या फरकाने बाजी मारताना पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली बाजार समितीची निवडणूक होती. यात पंकजा मुंडेंचा विजय मानला जातोय. हा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे दोघेही ऐकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. त्यामुळे प्रत्येक लढतीतच दोघेही पूर्ण ताकदीने उतरतात. त्यामुळे बीड जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक ही अटीतटीची होताना दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी एकहाती सत्ता मिळवताना पंकजा मुंडे यांना मोठा धक्का दिला होता.
मात्र या धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपाने या पराभवाचा वचपा काढला अशी चर्चा आता बीड जिल्ह्यात रंगत आहे. या दृश्यांमुळे दोन्ही मुंडे गटात किती टोकाची चुरस असल्याचे दिसून येत आहे.