बीड : भाजपचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडली आहे. यामुळे बीड जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भगीरथ बियाणी यांच्या घरी आज दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याचा आवाज आला. गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यामुळे नागरिकांची धांदल उडाली. तेव्हा बियाणी यांच्या खोलीत जाऊन पाहिले असता, ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. या घटनेमुळे बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलीस व बियाणीचे समर्थक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर बियाणी यांच्या घराची पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर बियाणी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, बियाणी यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, स्वत: वर गोळी झाडून बियाणी यांनी आत्महत्या का केली, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही. तरी, पुढील तपास बीड शहर पोलीस करीत आहेत.