मुंबई : भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं दीर्घ आजाराने आज शुक्रवारी (23 फेब्रुवारी) रोजी निधन झालं. ते 59 वर्षांचे होते. राजेंद्र पाटणी हे गेल्या दोन-तीन वर्षांपासून आजारी होते. मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत होते.
राजेंद्र पाटणी यांचा राजकीय प्रवास
राजेंद्र पाटणी हे शिवसेनेकडून 1997 ते 2003 पर्यंत शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून गेले होते. 2004 ते 2009 पर्यंत ते वाशीमच्या कारंजा मतदारसंघात विधानसभामध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून गेले होते. मात्र 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत २०११ मध्ये त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती . मात्र 2014च्या निवडणुकीत भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले. त्यावेळी भाजपाकडून कारंजा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली. ते निवडून आले.
त्यानंतर भाजपकडून त्यांना जिल्हाअध्यक्षपद दिले गेले, 2019 मध्ये ते पुन्हा कारंजा मतदारसंघात भाजप आमदार म्हणून निवडून गेले. कोरोना काळात त्यांना दोन वेळा कोरोना झाला होता. त्याच दरम्यान किडनी विकाराने त्रस्त होते. त्यानंतर त्यांना त्वचेचा कँसर झाल्याचं निदान झालं.
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू
देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. गेल्या काही महिन्यापासून ते रिलायन्स हॉस्पिटल मुंबई इथ ते उपचार घेत होते.
राजकीय वर्तुळात शोककळा
आजच शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं. त्यापाठोपाठ राजेंद्र पाटणी यांचं निधन झालं. त्यामुळे, राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राजेंद्र पाटणी हे सुद्धा एकेकाळचे शिवसैनिक होते. त्यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.