लोणी काळभोर, ता.१८ : कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच चित्तरंजन त्रिंबक गायकवाड यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र अवैध केले आहे. त्यांमुळे गायकवाड यांचे सरपंचपद धोक्यात आले आहे. हे आदेश अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिले आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चित्तरंजन गायकवाड यांनी निवडणूक आयोगाकडे कुणबी जातीचे प्रमाणपत्र सादर करून सरपंचपदासाठी उभे राहिले होते. मात्र कल्पना बाबासाहेब काळभोर, प्रीतम भास्कर काळभोर व ऋषिकेश विद्याधर काळभोर यांनी यावर आक्षेप घेऊन निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
चित्तरंजन गायकवाड यांचा कुणबी (83) (इतर मागास वर्ग ) जातीदावा अमान्य करण्यात येत असून सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा पारनेर (जि. अहमदनगर) यांनी निर्गमित केलेले कुणबी या जातीचे प्रमाणपत्र “अवैध” ठरविले आहे. ते जातीचे प्रमाणपत्र जप्त करण्यात येणार आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने केलेल्या पडताळणीत चित्तरंजन गायकवाड यांचे जातीचे प्रमाणपत्र निर्गमित केले आहे. त्यांमुळे गायकवाड यांचे सरपंचपद रद्द झाले आहे. तर सरपंच चित्तरंजन गायकवाड यांना समितीच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायायालयात दाद मागता येणार आहे.