अहमदाबाद : गुजरात राज्यात भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा गगनभरारी घेण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत असताना भाजपाने स्वतःचाच विक्रम मोडण्यासाठी तयार आहे. भाजपाने १२७ जागी विजय मिळविला होता. यावेळी मात्र गुजरातमधील १८२ पैकी तब्बल १५३ ठिकाणी भाजपाचे उमेदवार आघाडीवर असल्याने काँग्रेस व आम आदमी पार्टी यांचा सुपडा साफ झाल्याची चिन्हे दिसत आहेत. या निवडणुकीत काँग्रेस १९ ठिकाणी, आप ७ ठिकाणी तर इतर केवळ ३ ठिकाणी आघाडीवर आहेत.
ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काँग्रेस व आम आदमी पक्षाने प्रतिष्ठेची केली होती. मात्र, गुजराती मतदार किती खंबीरपणे भारतीय जनता पक्षाच्या मागे उभा असल्याचे पुन्हा एकदा आधिरेखित होत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा, व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नियोजन यावर भारतीय जनता पक्षाने ही निवडणुकीत इतर पक्षांना धोबीपछाड दिल्याचे चित्र दिसून येत आहेत.
निवडणुकीनंतर सर्व एक्झीट पोलनी ही निवडणूक भारतीय जनता पक्ष एकतर्फी जिंकणार असल्याचे भाकीत केले होते. हे भाकीत गुजरातमध्ये अगदी तंतोतंत जुळत असल्याने गुजरात येथील कार्यकत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लागू केलेल्या विविध योजना आणि विकास या दोन गोष्टींवर प्रामुख्याने भर देण्यात आला होता. गुजराती माणूस हा नेहमी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने खंबीरपणे उभा असल्याचे या निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
यावेळची निवडणूक आम आदमी पक्षाने प्रतिष्ठेची केली होती. त्याबरोबरीने काँग्रेसची सुरू असलेली भारत जोडो यात्रा देखील सुरू होती. आप आणि काँग्रेसचा प्रचारात देखील मोठी ताकद लावली होती. मात्र, या निवडणुकीत सर्वच पक्षांची धूळधाण झाली असून भाजपाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
सध्या प्रसिद्ध झालेल्या आकड्यानुसार भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येण्याची शक्यता आहे. सध्या असलेली १८२ पैकी १५३ जागांची आघाडी भारतीय जनता पक्ष कितपत टिकवून ठेवतो, हे आगामी काही तासात स्पष्ट होणार आहे.