मुंबई : सुमारे ७२ तासांत दोन गुन्हे दाखल झाल्याने व्यथित झालेले राष्ट्रावादीचे मुंब्रा कळवा येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपला राजीनामा सोपविला. पत्रकार परिषद घेत जयंत पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.
‘माझ्यावर खुनाचंही षडयंत्र त्यांनी रचले होते, त्याचे वाईट वाटले नाही. पण माझ्याविरोधात विनयभंग ३५४ कलम लावले गेले, याचे वाईट वाटत आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड भावुक झाले.
इतक्या खालच्या स्तरावर राजकारण सुरू आहे, मला विनयभंगाचा गुन्हा मान्य नाही, असे आव्हाडांनी स्पष्ट केले.माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला तरी मी घाबरणारा नाही. पण विनयभंगाचा गुन्हा दाखल होणे, माझ्या तत्वात बसत नाही. माझा स्वभाव अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल होणे माझ्या मनाला वेदना देणारा आहे, असे आव्हाड म्हणाले आहे.
खालच्या स्तराचे आरोप झाल्याने आव्हाड व्यथित झाले आहेत. पोलीससुद्धा कायद्याने वागत नाहीत. आव्हाडांनी माझ्याकडे राजीनामा सोपवला असून त्याबाबतचे पत्र मला त्यांनी दिले आहे. लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ती क्लिप पहावी कारण विनयभंग झाल्याचे कुठे दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणामध्ये त्यामध्ये लक्ष घालतील अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.