रायपूर : विधानसभा निवडणूक पार पडलेल्या पाचपैकी मिझोराम वगळता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमध्ये आज मतमोजणी होत आहे. दरम्यान, छत्तीसगडमध्ये भाजपने जोरदार मुसंडी घेतली असून भूपेश बघेल यांची डोकेदुखी वाढली आहे. भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पुन्हा सत्ता खेचून आणण्यात यशस्वी होईल, असा अंदाज विविध सस्थांच्या एक्झिट पोलमधून व्यक्त केला होता. मात्र मतमोजणीच्या सुरवातीपासूनच भाजपने आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, विधानसभेच्या ९० जागांपैकी ६१ जागांवरील कल हाती आले असून त्यामधील ३१ जागांवर भाजप उमेदवारांनी आघाडी घेतली आहे, तर २८ जागांवर काँग्रेसचे उमेदवार पुढे आहेत. तसेच एका जागेवर सीपीआयच्या उमेदवाराने आघाडी घेतली आहे.
आत्ताची टक्केवारी काय सांगते?
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत मोजण्यात आलेल्या मतांपैकी भाजपने सर्वाधिक ४४. २३ टक्के मते घेतली आहेत, तर काँग्रेसच्या वाट्याला ४२.३७ मते आली आहेत. मतांच्या टक्केवारीतही भाजप पुढे असल्याने काँग्रेसला पिछाडी कमी करणं, आव्हानात्मक ठरणार आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना दिलासा देत पिकांच्या आधारभूत किंमतींमध्ये केलेली वाढ, गोरक्षणासाठी घेतलेले निर्णय आणि महिलांसाठी लाभदायक ठरणाऱ्या योजनांच्या आधारे राज्यातील जनता आपल्याला पुन्हा सत्तेची खुर्ची देईल, असा भूपेश बघेल सरकारला विश्वास होता. हा विश्वास सार्थ ठरणार की भाजप बाजी मारणार, महत्वाचं ठरणार आहे.