पुणे : लोकसभेचे पडघम वाजू लागताच इंदापूर विधानसभेची जागा सोडा तरच आम्ही लोकसभेला काम करू असा गर्भित इशारा हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी अजित पवारांना दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत इंदापूरच्या जागेवरुन महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अंकिता पाटील म्हणाल्या की,”आम्ही विधानसभा निवडणुकांची तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात त्या दृष्टीने अनेक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. आम्ही याआधी महाआघाडीत होतो, आता महायुतीत आहोत. मागच्या तिनही वेळेस आमची फसवणूक झाली आहे. अजित पवारांनी आपल्याला तिनदा शब्द देऊनही पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे यावेळी आमचे विधानसभेला काम करणार असतील तरच आम्ही लोकसभेला त्यांचे काम करु.”असे, अंकिता पाटील यांनी म्हटले आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत केवळ 40 दिवस अगोदर हाती कमळ घेऊन ही हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात जवळपास एक लाख 11 हजारांचं मताधिक्य मिळवलं. परंतू अल्पमताने हर्षवर्धन पाटील यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला. असं असलं तरी निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा कार्यकर्ता लाखोच्या संख्येने हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीमागे उभा होता हेच हर्षवर्धन पाटील यांनी दाखवून दिले होते.
दरम्यान, महायुतीत इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा तिढा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण 2024 ला विधानसभा निवडणुकीत जो आम्हाला मदत करेल त्यालाच आम्ही लोकसभेला मदत करू, असे म्हणत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता व पुत्र राजवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. तसेच 2024 ला इंदापूर विधानसभा निवडणूक ही हर्षवर्धन पाटील लढवणारच, असा निर्धारही या दोघांनी व्यक्त केला आहे.