पुणे : राज्यातील नागरी सहकारी बँकांचे पालकत्व स्वीकारलेल्या महाराष्ट्र अर्बन को-ऑप फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यभर मतदान झाले होते.
१४ नोव्हेंबर रोजी फेडरेशनच्या वडाळा येथील कार्यालयात मतमोजणी पार पडली.याचा निकाल जाहीर झाला आहे.
२१ पैकी १२ जागा बिनविरोध पार पाडल्या. परंतु उर्वरित ९ जागांवर अर्ज मागे न घेतल्यामुळे निवडणूक घेण्यात आली. निवडणूक झालेल्या ९ जागांपैकी मुंबई येथील ३, पुणे येथील २ आणि कोकण विभागातील १ अशा एकूण सहा जागांवर अनास्कर यांच्या पॅनेलला विजय मिळाला.
महाराष्ट्र अर्बन को-ऑप.बँक्स फेडरेशनच्या निवडणुकीत पुणे-नगर-सोलापूर मतदारसंघातून फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष विद्याधर अनास्कर आणि पुणे मर्चंट्स को-ऑप.बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे हे निवडून आले.
पुणे विभागातून कॉसमॉस को-ऑप. बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे हे निवडणूक लढवीत होते. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.
पुणे विभागात दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ४४ पैकी ४३ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी दोन मते बाद झाली. उर्वरित ४१ मतांपैकी अनास्कर यांना ३२ मते, ढेरे यांना २० मते, मिलिंद काळे यांना १९ मते आणि आनंद गावडे यांना १० मते मिळाली.
ढेरे यांना काळे यांच्यापेक्षा केवळ एक मत जास्त मिळाल्याने ते निवडून आले.अनास्कर यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत.