अजित जगताप
सातारा : प्राथमिक शिक्षक बँकेच्या चार वर्षाच्या कारकिर्दीत लुटालूट करणाऱ्या टोळीने उच्छाद मांडला आहे. त्यामुळे ८७ वर्षाचे बँकेचे माजी अध्यक्ष व जेष्ठ सभासद ज. शा. यादव सभासद परिवर्तन पॅनेलचे योद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांच्या हस्ते श्री कुरणेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवण्यात आला आहे.
दोन महिन्यांपासून मनोमिलन साठी बलवंत पाटील यांच्या प्रयत्नातून एकत्र आले आहेत. याचे समाधान वाटत असून शिक्षक बँकेत लुटालूट करणारी टोळी आहे. तिला हद्दपार करण्यासाठी सक्षम पर्याय निर्माण झाला आहे. याचे समाधान वाटले. असे स्पष्ट करून जेष्ठ सभासद श्री यादव म्हणाले,१९५५ सालापासून बँकेचा सभासद असून बँकेतील टोळी संपविण्यासाठी शिक्षक संघ व समिती एकत्रित आले आहेत. त्यामुळे सभासद परिवर्तन पॅनेलचा विजय निश्चित झाला आहे.
उदय शिंदे म्हणाले, शिक्षक बँकेत परिवर्तनाची गरज निर्माण झाली आहे.त्यामुळे आपल्या पॅनेलच्या २१उमेदवारांचा विजय ही काळ्या दगडावरील रेघ ठरली आहे. जुने व नवीन सहकारी शिक्षक एकविचाराने एकत्र आले आहेत.
मनोमिलनाचे प्रणेते बलवंत पाटील म्हणाले,हा प्रचाराचा शुभारंभ नसून हा विजयी मेळावा आहे, प्रत्येकांनी जबाबदारीने मताधिक्य वाढीसाठी दहा दिवस परिश्रम घेतले पाहिजे.परिवर्तन हा संसाराचा नियम आहे तो लागू पडत आहे.शिक्षक बँक ही मातृ संस्था असून तिला वाचविण्यासाठी आपण तीन नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र आलो आहे.मी फक्त निमित्त आहे.
आपल्या धडाकेबाज भाषणात शिक्षक नेते संभाजीराव थोरात म्हणाले, विद्यार्थ्यांना वेळेची गणित शिकवणाऱ्या काहींना वेळ पाळता आली नाही.कोणीतरी बोलले पाहिजे. पूर्वी शिक्षकांना वेतन कमी होते आता सुधारणा झाली आहे. शिक्षक बँकेच्या अलीकडच्या काळात अपप्रवृत्ती बोकाळली आहे. आम्ही शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जीवाचे रान करतो. तसेच कोल्हापूर व आता साताऱ्यात शिक्षक बँकेत लुटालूट पाहवत नाही. म्हणून परिवर्तन घडवून आणण्यासाठी कायमस्वरूपी एकत्र आलो आहे.
बँकेत सत्ता आल्यानंतर सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक देताना बँकेचे संरक्षण व संवर्धन शप्पथ पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असा ही सल्ला दिला. महिला शिक्षिकांच्या वतीने सौ संगिता सणस म्हणाल्या, पहिल्यांदा भाषण करीत असून परिवर्तन घडवून येण्याची शक्यता दिसत आहे.सभासद परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार मताधिक्याने निवडून येतील, त्यासाठी तीन नेते एकत्र आले असून आदरणीय बलवंत पाटील यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वजण साक्षीदार बनले आहेत.
यावेळी पॅनेलचे सर्व उमेदवारांचा परिचय करून देण्यात आला. तसेच जेष्ठ सभासद शहाजी धामणेरकर यांनी ही मनोगत व्यक्त केले. यावेळी विश्वभर रणनवरे, दिपक भुजबळ यांनी मनोगत व्यक्त करताना एकजुटीने सर्व एकत्र आल्याचे कौतुक केले. सुभाष ढालपे, दिपक गिरी, सुभाष शेवाळे, शिवाजी शिंदे, रशिद मुजावर, धीरज गोळे, संजय खाडे, गजानन वारागडे, विजयाश्री मदने, दिलीप गंगावणे, सुरेश गावडे,आशा बोराटे,विक्रम डोंगरे, बाबूमिया आत्तार व मान्यवर शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, प्रास्तविक सी. एल. यादव यांनी केले तर शंकर देवरे यांनी आभार मानले.शिक्षकांच्या एकजुटीने हा विजय मेळावा झाल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया जयघोषाने प्रचाराचा शुभारंभ करताना श्री कुरणेश्वरच्या दर्शनासाठी आलेल्या अनेक विद्यार्थी, पालकांनीही सभासद परिवर्तन पॅनेलला शुभेच्छा दिल्या.