Ajit Pawar मुंबई : सर्वात आधी जखमींवर व्यवस्थित उपचार आणि मृतांवर व्यवस्थित अंत्यसंस्कार या गोष्टी पार पडायला हव्यात, त्यानंतर यात कोण दोषी होतं वगैरे तपासता येईल, कुणी हलगर्जीपणा दाखवलाय, कुणी दुर्लक्ष केलं आहे, कुणी वेळ निवडली आहे या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. आम्हाला कुणालाच यात राजकारण करायचं नाही. कुणावरच असा प्रसंग येता कामा नये. पण तो सरकारी कार्यक्रम होता. असं व्हायला नको होतं, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यक्रमानंतर उष्माघातानं तब्बल ११ जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणावर दिली आहे.
घटनेविषयी बोलताना अजित पवार म्हणाले…!
‘एकूण ८ जण उपचार घेत आहेत. दोघं आयसीयूत व्हेंटिलेटरवर आहेत. त्यातील एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. आत्ता एमजीएम पनवेल, एमजीएम वाशी, डीवायपाटील, टाटा रुग्णालय अशा वेगवेगळ्या रुग्णालयात रुग्ण आहेत. महाराष्ट्रभूषण पुरस्कार फार महत्त्वाचा आहे. पण हलगर्जीपणा झाल्यामुळे काय घडू शकतं, हे आजच्या घटनेतून पाहायला मिळालं. महत्त्वाच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं. एक काळा डाग त्यावर बसला आहे.
अजूनही नेमके किती लोक मृत्यूमुखी पडले हा आकडा समोर येत नाहीये. मुळात त्यांची वेळ चुकली. वेळ संध्याकाळची असती, तर अधिक योग्य झालं असतं. कारण संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी राहाते. एप्रिल-मेमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊच नयेत. आप्पासाहेब धर्माधिकारींना मानणाना वर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने लोक येतात. ती काळजी घ्यायला हवी होती.’
ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने काल गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाची वेळ दुपारची असल्याने उन्हाचा तडाखा जास्त होता. उन्हामुळे कार्मक्रमाला हजेरी लावलेल्या अनेक लोकांची प्रकृती उष्माघाताने खालावली, त्यात ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.