Ajit Pawar मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर आळवताना दिसून आला. डबल इंजिनाला तिसरा डबा जोडल्यामुळे सर्व महत्त्वाची खाती तिसऱ्या डब्याकडेच जातील, अशी चर्चा शिंदे गटात होत होती. (Ajit Pawar) अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास शिंदे गटाने कडाडून विरोध केला. या सर्व घडामोडींनंतर आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, यासाठी पडद्यामागे हालचालींना वेग आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Ajit Pawar)
२०२४ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये मराठा चेहरा म्हणून अजित पवार यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक व्हावी, असा नेत्यांचा सूर आहे. अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी कसं बसवायचं? यावर चर्चा सुरू आहे. आपण पाचवेळा राज्याचा उपमुख्यमंत्री बनलो. पण त्यापुढे गाडी जात नाही, अशी खंत अजित पवार यांनी आज व्यक्त केली. त्यानंतर पडद्यामागील घडामोडी वेगाने घडत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे गटाला योग्य जागा दाखवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार हे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने शिंदे गट बाद झाला नाही, तर कोर्टातून यावर काही तोडगा निघेल का? तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कोर्टात जाईल का? यावर चर्चा सूरु असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेण्याच्या दोन दिवस आधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला होता. आपल्या ४० समर्थक आमदार आणि खासदारांची स्वाक्षरी घेऊन निवडणूक आयोगात याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील निवडणूक आयोगात याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. हा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे.