लोणी काळभोर, (पुणे) : या आगोदर आपण मंत्री, आमदार, खासदार यांनी आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार आयोजित केलेला पाहिले आहे. जिल्ह्यासह तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर एका सरपंचाने जनता दरबार घेतल्याचे कोठेही आढळून येत नाही. मात्र, हवेली तालुक्यातील कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी ही किमया साधली असून आठवड्यातील प्रत्येक रविवारी हा दरबार भरणार असल्याची माहिती सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी दिली.
सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी “ग्रामपंचायत कदमवाकवस्तीतील समस्या तुमची, सोडविण्याची जबाबदारी आमची” या मथळ्याखाली सरपंच जनता दरबाराचे आयोजन आठवड्यातील प्रत्येक रविवारी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत केले आहे. सरपंच गायकवाड यांच्या निवास्थानी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना कामे सोडून सुट्टी काढून ग्रामपंचायतीशी निगडीत कामांसाठी ग्रामपंचायतीत हजर रहाणे शक्य होत नाही. हा विचार करून आपल्या नागरिकांच्या सेवेसाठी व समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रत्येक रविवारी हा जनता दरबार घेण्यात येणार आहे.
दरम्यान, या जनता दरबारामध्ये ७/१२ उतारे, ८ अ उतारे, घरांच्या नोंदी, रहिवासी दाखले, व्यवसायासाठी आवश्यक दाखले, रेशनकार्ड, प्रभागातील समस्या व प्रश्न, वैयक्तिक कामे, सार्वजनिक विकासकामे, ग्रामपंचायत सतरावरील सर्व कामे केली जाणार आहेत. ज्या नागरिकांनी मागणी केलेले ग्रामपंचायतीमधील दाखले सोमवारी घरपोहोच देण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
याबाबत बोलताना गायकवाड म्हणाले, “नोकरी करणाऱ्या नागरिकांना सुट्टी काढून ग्रामपंचायतीशी निगडीत कामांसाठी ग्रामपंचायतीत हजर रहाणे शक्य होत नाही. तसेच सर्वसामान्य लोकांसाठी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नोकरी करणाऱ्या नागरिकांनी रविवारी एखादा दाखल्याची मागणी केली असता त्या नागरिकाला हा दाखला सोमवारी घरपोहोच देण्यात येणार आहे.