धाराशिव : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उस्मानाबाद येथील प्रभारी जिल्हाध्यक्षा मनीषा राखुंडे पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.१४) संध्याकाळी घडली आहे. पा
टील यांनी प्रसंगावधान दाखवून तो चाकूचा वार हातावर झेलल्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या. मात्र या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा राखुंडे पाटील यांच्या घरात मंगळवारी संध्याकाळी चेहरा कपड्याने बांधलेल्या अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला. हातात चिठ्ठी देऊन दुसऱ्या हाताने त्यांच्यावर धारदार चाकून वार हल्ला चढवला. मात्र, प्रसंगावधान राखून पाटील यांनी तो वार हातावर झेलला.
पाटील यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या घरातील लोकांनी पाटील यांच्या घराकडे धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाला. नागरिकांनी पाटील यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले.
मनीषा पाटील यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याची घटना त्यांच्या घरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरु केला आहे. पाटील यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. या घटनेचा लवकरच उलगडा होईल, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, बचत गटाच्या टेंडर प्रक्रियेत अनियमिततेविरोधात केलेल्या तक्रारीमुळे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एच. निपाणीकर यांचा यामागे हात आहे. असा संशय मनीषा पाटील यांनी व्यक्त केला आहे. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.