मुंबई : सध्या निर्मिती अवस्थेत असलेला दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्ग, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आणि अनेक नवे रस्ते प्रकल्प यांच्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला आणखी चालना मिळेल असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाने आज मुंबईत आयोजित केलेल्या दुसऱ्या ‘संकल्पातून सिद्धी – नवा भारत, नवे संकल्प परिषदे’च्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई शहराला दिल्ली, पुणे आणि बंगळूरू या शहरांशी जोडणाऱ्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे असे त्यांनी सांगितले.
केवळ १२ तासात मुंबई ते दिल्ली :
सुमारे 1 लाख कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे 70% काम पूर्ण झाले असून या महामार्गाच्या बांधणीनंतर भारताची राष्ट्रीय राजधानी आणि आर्थिक राजधानी यांच्यातील प्रवासाला 12 तास इतका कमी वेळ लागेल अशी माहिती केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी दिली.
ते म्हणाले, “सुमारे 50,000 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचे काम हाती घेऊन वसई-विरारपर्यंत, तसेच त्याच्याही पुढे पोहोचणारे तटवर्ती रस्ते आणि सी-लिंक मार्ग यांचे जाळे निर्माण करून मुंबईतील नरीमन पॉइंटहून दिल्लीपर्यंत अखंडित प्रवास सुविधा निर्माण करणे हे
माझे स्वप्न आहे.”
या प्रकल्पाच्या कामासाठी लागणारे पोलाद आणि सिमेंट यांच्यावरील राज्य वस्तू आणि सेवा कर माफ करावा अशी विनंती गडकरी यांनी महाराष्ट्र सरकारला केली.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा पश्चिमेकडील बायपास रस्ता आणि पुणे रिंग रोड यांच्या माध्यमातून मुंबई आणि बंगळूरू ही शहरे थेट रस्त्याने जोडण्याच्या योजनेची माहिती देखील केंद्रीय मंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, रस्ते संरेखन करण्याची योजना यापूर्वीच तयार झाली आहे आणि या रस्त्याचे काम लवकरच सुरु होईल अशी अपेक्षा आहे.
पुणे आणि औरंगाबाद या शहरांदरम्यानचा प्रवासाचा कालावधी 2 तास इतका कमी करणाऱ्या नव्या रस्त्याच्या संरेखनाचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती देखील गडकरी यांनी दिली.
सुरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर अशा मार्गाच्या नव्या रस्त्याचे संरेखन झाले असून या रस्त्यामुळे उत्तर भारतातून दक्षिणेकडे येणाऱ्या वाहतुकीपैकी 50% वाहतूक अन्य मार्गाने वळविता येईल आणि त्यामुळे ठाणे, मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये वाहनांमुळे होत असलेल्या वायू प्रदूषणात लक्षणीयरीत्या घट होईल.