सुरेश घाडगे
परंडा : सिना कोळेगाव धरण जलासयाने तुडूंब १०० टक्के भरले असून माजी आमदार राहूल मोटे यांनी मंगळवार ( ता. २७ ) जलपुजन केले. यावेळी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. सोमवारी ( ता. २६ ) एकूण २१ दारांपैकी ८ दारातून १० हजार १४० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
परंडा तालुक्यातील साकत मध्यम प्रकल्पही भरला आहे तर यापूर्वीच तालुक्यातील चांदणी मध्यम प्रकल्प,खासापुरी मध्यम प्रकल्प, पांढरेवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. सोमवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. तालुका सिंचन -जलमय झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे .
जिल्हयातील साडेपाच टीएमसीचा सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या सिना कोळेगाव प्रकल्पातील पाणी साठा १०० टक्के झाला आहे . शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे .प्रकल्प क्षेत्रात तसेच नगर जिल्हा परिसरातील पाणी खैरी, नळी द्वारे सीना नदीत येते . त्यामुळे या भागात दमदार पाऊस झाल्याने या तीन्ही नद्या दुथडया वाहील्याने प्रकल्प भरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यातून आनंद व्यक्त होत आहे.
दरम्यान, गत वर्षी हा प्रकल्प २८ सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाने भरला होता. साडेपाच टिएमसी पाणीक्षमता असलेल्या या प्रकल्पात निर्मितीपासून पूर्ण क्षमतेने जलसाठा होण्याची हि ७ वी वेेळ आहे .सलग तिसऱ्यांदा धरण भरल्याने हॅट्रीक साधली आहे .
सिना कोळेगाव धरणाचे पाणलोट क्षेत्र ५५६९ चौ . किमी असून धरणाची पाणी साठवण क्षमता १५० . ४९ दलघमी ( साडेपाच टीएमसी ) आहे .१०४ .३५ दलघमी पाणीसाठा वापरता येतो तर उपयुक्त पाणीसाठा ७६ .१८ दलघमी आहे . पुर्ण जलाशय पातळी ५०२ .८०० मीटर. तर माथा पातळी ५०८ मीटर आहे . बुडीत क्षेत्राची पातळी ५०३ .४०० मी .आहे . धरणाची महत्तम उंची २६ .१०, एकूण लांबी १७७० मीटर, सांडव्याची लांबी ४२३ .८० मीटर, सांडव्याची वक्रद्वारे एकूण २१ असून ती प्रत्येकी १२x५ मीटर आहेत.परंडा बाजू व करमाळा बाजू असे दोन पंपगृह असून परंडा -व्हीटी पंपस् ४ नं ८०० बीएचपी व करमाळा व्हीटी -पंपस् ३ नं .४८० बएचपी आहे .
या प्रकल्पाची १९९० – ९१ प्रशासकीय मान्यता ७० . ८८ कोटी होती .२००८ सुधारीत प्रशासकीय मान्यता ४५५ . २८ कोटी झाली .परंडा तालुक्यातील ८७०० हेक्टर व करमाळा तालुक्यातील ३४०० हेक्टर असे एकुण १२१०० हेक्टर क्षेत्र भिजणारे क्षेत्र असून १३३१० हेक्टर क्षेत्र लागवडी योग्य तर एकूण लाभक्षेत्र १४१३५ हेक्टर आहे .परंडा शहराला येथून पाणीपुरवठा योजना आहे . तर आनाळा साठवण तलावासाठी आनाळा उपसासिंचन योजना आहे.
साकत मध्यम प्रकल्पाचे काम गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत १९९४ साली पूर्ण झालेले आहे. प्रकल्पाची प्रकल्पीय पाणी साठा क्षमता १४ . ४९० दलघमी, उपयुक्त पाणीसाठा १३ .४८० दलघमी, मृत पाणीसाठा १ .०१० दलघमी, पाणलोट क्षेत्र १९५ .८४० चौ . कि.मी., लाभक्षेत्र -प्रकल्पीय सिंचन क्षेत्र – उजवा कालवा अंतर्गत १७२५ हेक्टर तर डावा कालवा अंतर्गत ६३० हेक्टर असे एकूण २३५५ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येते.
या प्रकल्पाची धरण माथा पातळी ५४० .८०० मीटर, महत्तम पुर पातळी ५३८ .६०० मीटर, पुर्ण संचय पातळी ५३६ .८०० मीटर, जोता पातळी ५३१ मीटर, नदी तळ पातळी ५३० .५०० मीटर आहे . या प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून २ .३२ घमी / सेकंद तर डाव्या कालव्यातून ० . ९८ घमी / सेकंद पाणी विसर्ग केला जातो.
दरम्यान, परंडा तालुक्यातील चांदणी मध्यम प्रकल्पाचा उपयुक्त पाणीसाठा(२१.५८० दलघमी), खासापुरी मध्यम प्रकल्प(१३.०४० दलघमी) ,साकत मध्यम प्रकल्प १३.४८० दलघमी असून हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. सांडवे वाहत असल्याने नदी नाले दुथडे भरून वाहत आहेत.