बीड: परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुणांची मानवी तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका तरुणासह महाराष्ट्रातील सुमारे 25 युवकांना म्यानमार-थायलंड सीमेवरील भागात डांबून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी भारतातील तब्बल 700 ते 800 नागरिक अडकले असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणातील पीडित तरुण स्वप्नील काळुंके हा ग्राफिक डिझायनर असून तो नोकरीच्या शोधात होता. सोशल मीडियावर आलेल्या एका जाहिरातीच्या माध्यमातून त्याने बँकॉकमधील डेटा एंट्रीच्या नोकरीसाठी अर्ज केला होता. दरमहा 70 हजार रुपये पगाराचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार तो 4 जून रोजी परदेशात गेला. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर एजंटांनी त्याचे पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला म्यानमार सीमेजवळील एका ठिकाणी नेण्यात आले.

स्वप्नीलने व्हॉट्सॲप कॉलद्वारे आपल्या पत्नीशी संपर्क साधत तेथील परिस्थितीची माहिती दिली. त्याच्या म्हणण्यानुसार, अडकलेल्या तरुणांकडून बंदुकीच्या धाकावर दररोज 16 ते 18 तास ऑनलाइन सायबर फसवणुकीचे काम करून घेतले जात आहे. काम करण्यास नकार देणाऱ्यांना मारहाण, विजेचे शॉक आणि इतर प्रकारचा छळ सहन करावा लागत असल्याचाही दावा त्याने केला आहे. काही जणांची हत्या करण्यात आल्याचेही त्याने सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची तक्रार स्वप्नीलच्या पत्नीने बीड सायबर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा संबंध आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि सायबर फसवणुकीशी असल्याने परराष्ट्र मंत्रालयाशीही संपर्क साधण्यात आला आहे. अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.







