आगरतळा (त्रिपुरा): अनैतिक कृत्यात सहभाग असल्याच्या संशयावरून एका महिलेला तिचे दोन पुत्र व सुनेने झाडाला बांधून जिंवत जाळल्याची भयंकर घटना त्रिपुरात घडली. पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या सोमवारी मुसक्या आवळल्या. मिनाती देबनाथ (५५) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.
पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील चंपकनगर येथे शनिवारी रात्री ही घटना घडली. स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक रुग्णालयात पाठवला. २०२२ मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर मिनाती त्यांची दोन मुले आणि एका सुनेसह चंपकनगरात राहत होत्या. त्यांचा मोठा मुलगा आगरतळा येथे राहतो. मुले आणि सुनेला त्या अनैतिक कृत्यात सहभागी असल्याचा संशय होता.
शनिवारी तिघांनी घरामागील झाडाला बांधून त्यांना जिवंत जाळले, अशी तक्रार मिनाती यांच्या भावाने पोलिसात दिली. त्यावरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी रणबीर देबनाथ, बिप्लब देबनाथ आणि रणबीरच्या पत्नीला अटक केली. पोलीस त्यांना न्यायालयासमोर हजर करून कोठडीची मागणी करणार आहेत. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे.